महागाई भत्त्यासह पेन्शनवाढ मंजूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:25 PM2019-07-15T23:25:52+5:302019-07-15T23:26:15+5:30
औरंगाबाद : महागाई भत्त्यासह साडेसात हजार रुपये पेन्शन मंजूर करा, मोफत वैद्यकीय सुविधा लागू करा, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पेन्शनवाढ ...
औरंगाबाद : महागाई भत्त्यासह साडेसात हजार रुपये पेन्शन मंजूर करा, मोफत वैद्यकीय सुविधा लागू करा, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पेन्शनवाढ मंजूर करा, यासह पेन्शनधारकांनी दिलेल्या विविध घोषणांनी सोमवारी सिडकोतील कर्मचारी भविष्य निधी संघटन प्रादेशिक कार्यालयाचा परिसर दणाणून गेला.
ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीतर्फे सोमवारी कर्मचारी भविष्य निधी संघटन कार्यालयासमोर (पीएफ) धरणे देण्यात आली. आंदोलनासाठी संपूर्ण मराठवाड्यातून अल्प पेन्शनधारक शहरात दाखल झाले होते. यावेळी आंदोलकांनी ‘भगतसिंह कोशीयारी कमिटी लागू करा’, ‘३१ मे २०१७ चे परिपत्रक रद्द करा’ यासह पेन्शनवाढीसंदर्भातील विविध फलक हाती धरले होते. मागण्यांसंदर्भात जोरदार घोषणा देण्यात येत होत्या. आंदोलनात महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग होता. यावेळी अल्प पेन्शधारकांचा मेळावाही पार पडला. यामध्ये उपस्थितांनी अल्प पेन्शनमुळे भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या.
आंदोलनाला एस. एन. आंबेकर, जिल्हा सचिव कमलाकर पांगारकर, साहेबराव निकम, डी. ए. लिपणे पाटील, मोहन हिंपळनेकर, भास्कर मतसागर, किसन साळवे, सानोपंत कावळे, एच. सी. चव्हाण, डी. एच. करजगावकर, अशोक चक्रे, निर्मला बडवे, गोविंदअप्पा डांगे, मुकुंद कुलकर्णी, मारोती फुलारी, नारायण ठोकळे आदी उपस्थित होते.
अहवाल, पत्रकाची होळी
आंदोलनात पेन्शनधारकांकडून उच्च अधिकार नियंत्रण समितीच्या अहवालाची आणि ३१ मे रोजी २०१७ च्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.
थरथरते हात, नजर कमजोर
आंदोलनात सहभागी झालेल्या अनेकांचे हात थरथरत होते. अनेकांना चालणेही अवघड होत होते, तर अनेकांची नजरही कमजोर होती; परंतु काठीचा आणि नातेवाईकांचा आधार घेत ते आंदोलनात सहभागी झाले. अवघ्या २ ते ३ हजार रुपयांच्या पेन्शनमध्ये काय काय करायचे, असा सवाल पेन्शनधारकांनी उपस्थित केला.