अनुदान वाटप धिम्या गतीने
By Admin | Published: March 15, 2016 12:11 AM2016-03-15T00:11:40+5:302016-03-15T01:16:51+5:30
व्यंकटेश वैष्णव , बीड दुष्काळी अनुदानाचा सरकारने मोठा गाजावाजा केला. मात्र वाटप धिम्या गतीने होत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.
व्यंकटेश वैष्णव , बीड
दुष्काळी अनुदानाचा सरकारने मोठा गाजावाजा केला. मात्र वाटप धिम्या गतीने होत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. जिल्हा प्रशासनाने वाटपाला विलंब होत असल्याबाबत बँकांकडे मनुष्यबळ अपुरे असल्याचा बाऊ केला आहे. दुष्काळी अनुदानाची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयातून बँकांकडे गेली असली तरी संबंधित बँकांमधून शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडण्यास विलंब होत आहे.
बीड जिल्ह्यासाठी ५१ कोटी ५८ लाख ८ हजार एवढे अनुदान आले आहे, यापैकी ४९ कोटी ९० लाख ७ हजार ६१३ एवढे अनुदान बँकांकडे वर्ग झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून हे अनुदान वर्ग झाले असले तरी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात पडले नाही, ही वस्तूस्थिती आहे. शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी बँकांकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने विलंब होत आहे. शेतकरी दुष्काळी अनुदानाच्या आशेने संबंधित राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये चकरा मारीत आहेत; मात्र तेथे गेल्यानंतर बँक कर्मचारी अनुदान वाटपास अवधी असल्याचे सांगत आहेत.
दरम्यान, जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही आपल्याच मागण्यांचे पडले आहे. सोमवारपासून त्यांनी सामूहिक रजा टाकल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानासाठी प्रतीक्षा करावीच लागणार आहे.
दीड कोटी निधी पडून
दुष्काळी अनुदानातील दीड कोटींवर रक्कम अद्यापपर्यंत संबंधित तहसील कार्यालयांना वर्ग झाली नसल्याचे सोमवारी समोर आले आहे. बीड जिल्ह्यात एकूण ९६ हजार ९८७ शेतकरी अनुदानाचे लाभार्थी आहेत.
बीडमध्ये १०० टक्के वाटप
११ तालुक्यांपैकी बीड तहसीलने १०० टक्के निधी बँकांकडे वर्ग केला आहे, असे अहवालात नमूद आहे. सध्या बँकांमधून वाटपही सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळते; मात्र तालुक्यातील १३ हजार ८३९ पैकी ५ हजारांवर शेतकऱ्यांना ९०० ते ११०० एवढीच रक्कम दुष्काळी अनुदानाची मिळाली असल्याचे चौसाळा येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
बीड तालुक्यातील चौसाळा परिसरातील शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान एक महिन्यापूर्वीच जिल्हा बँकेत जमा झाले आहे. मात्र, बँकांच्या अंतर्गत अडचणींमुळे निधीचे वाटप करणे शक्य होत नाही. शेतकरी रोज बँकेकडे दुष्काळी अनुदानासाठी चकरा मारतात. मात्र, बँक कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.
४मागील आठवड्यात वाटप सुरळीत सुरू होते; मात्र सोमवारी जिल्हा बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषण करून बँक बंद केल्यामुळे शेतकरी संतप्त झाले व बँकेच्या दारालाच त्यांनी चपलांचा हार घालून आंदोलन केले.