११,६०३ फेरीवाल्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:03 AM2021-05-23T04:03:57+5:302021-05-23T04:03:57+5:30
मार्च आणि एप्रिल महिन्यांत कोरोनाच्या लाटेचा गतीने प्रादुर्भाव वाढत गेला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने तातडीने कडक निर्बंध लागू करण्याचा ...
मार्च आणि एप्रिल महिन्यांत कोरोनाच्या लाटेचा गतीने प्रादुर्भाव वाढत गेला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने तातडीने कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. हे कडक निर्बंध लागू करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हातावर पोट असलेल्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी पॅकेज जाहीर करून फेरीवाले, पथविक्रेते, रिक्षाचालक यांना मदत म्हणून प्रत्येकी १५०० रुपये देण्याची घोषणा केली. या घोषणेची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी नगरविकास विभागाने शासन निर्णयदेखील काढला.
मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, उपायुक्त अपर्णा थेटे, सहायक आयुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थापक सुरेंद्र पाटील, भरत मोरे यांच्या सहकार्याने शहरात १४ हजार १०३ फेरीवाल्यांची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी ११ हजार ६०३ फेरीवाल्यानी प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजनेंतर्गत कर्जासाठी बॅंकांत अर्ज दाखल केलेले असून, थेट फेरीवाल्यांच्या बॅंक खात्यावर १५०० रुपये अनुदान जमा करण्यात आले आहे.