हातातोंडाशी आलेला घास हिसकावला: वादळाच्या तडाख्याने केळीची बाग उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 11:45 AM2019-04-30T11:45:44+5:302019-04-30T11:49:53+5:30
गांधेलीतील घटना : काढणीसाठी आली होती केळी, क्षणात झाले होत्याचे नव्हते; शेतकरी आर्थिक संकटात औरंगाबाद : पावसाने दगा ...
गांधेलीतील घटना : काढणीसाठी आली होती केळी, क्षणात झाले होत्याचे नव्हते; शेतकरी आर्थिक संकटात
औरंगाबाद : पावसाने दगा दिल्याने दुष्काळाचे संकट, पाण्याची परिस्थितीही गंभीर, पैशांची अडचण तर पाचवीला पुजलेली. तरीही या सगळ्यांवर मात करून शेतात केळी पिकाची लागवड केली. लेकराप्रमाणे बाग जोपासली. काही दिवसांत काढणीला आलेली केळी भरघोस उत्पन्न देणार होती. परंतु वादळी वाºयाने केळीची बाग आडवी केली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. या अस्मानी संकटाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
गांधेली येथील शेतकरी सय्यद अख्तर सय्यद शब्बीर यांच्यावर हे संकट कोसळले आहे. गांधेलीत २ एकरपैकी काही क्षेत्रात त्यांनी केळीची जवळपास २ हजार झाडे लावली होती. अल्प पावसामुळे पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ ओढावली. अशा परिस्थितीत ठिंबक सिंचनाचा वापर करून केळीची बाग जोपासली. रात्रीचा दिवस करून बाग वाढविली. बाग चांगली फुलली होती.
गेल्या काही दिवसांत केळी काढण्यालायक झालेली होती. त्यामुळे आगामी काही दिवसांत झाडांवरून केळी काढण्याची तयारी सुरू होती. त्यातून येणाºया रकमेतून विविध कामे करण्याचे स्वप्नही रंगले होते. मात्र, निसर्गाला हे मान्य नव्हते. रणरणत्या उन्हात २८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारा सुटला. या वाºयाने त्यांची केळीची बाग अवघ्या काही क्षणात आडवी झाली. झाडांवरील केळीचे घड जमिनीवर कोसळले. त्यामुळे डाग लागल्याने ही केळी कोणी घेण्यास तयार नाही.
या आपत्तीची पाहणी, पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी तहसील कार्यालयाकडे केली आहे.
१.२० लाखांच्या उसनवारीतून बाग
सय्यद अख्तर यांनी केळीच्या बागेसाठी नातेवाईकांकडून १.२० लाख रुपये उसने घेतले होते. स्वत: जवळचे ८० हजार, असे २ लाख रुपये बागेसाठी खर्च केले. अवघ्या काही दिवसांत किमान ६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार होते. परंतु वादळी वाºयामुळे हे उत्पन्न हातातून गेले. आता नातेवाईकांचे उसने पैसे कसे द्यायचे, असा प्रश्न पडल्याचे त्यांनी सांगितले.
उन्हाचा तडाखा
उन्हामुळे केळी बागेला तडाखा बसत होता. पाणीपातळी खोल गेल्याने आधीच मेटाकुटीला आलो होतो. उष्णतेचे संकट केळीला मारक ठरत होते. त्यात कशीबशी तग धरून बाग वाढविली. मात्र पैसा, मेहनत वाया गेल्याचे सय्यद अख्तर सय्यद शब्बीर म्हणाले.