जयभवानीनगरात दारू दुकानदार आणि ग्राहकांत जोरदार हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 11:22 PM2019-06-07T23:22:58+5:302019-06-07T23:23:23+5:30
जयभवानीनगर येथील चौकात गुरुवारी रात्री दारू दुकानदार आणि ग्राहकांत जोरदार हाणामारी झाली.
औरंगाबाद : जयभवानीनगर येथील चौकात गुरुवारी रात्री दारू दुकानदार आणि ग्राहकांत जोरदार हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही गटांतील चार ते पाच जण जखमी झाले असून, पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले.
जयभवानीनगर येथील चौकातील वाईन बारचे व्यवस्थापक म्हणून सतीश हजारे हे काम करतात. गुरुवारी रात्री सिद्धार्थ निकाळजे हे नातेवाईकासह हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण आणि मद्य प्राशन केल्यानंतर हजारेने त्यांना दिलेल्या बिलात दारूचे जास्त पैसे आकारल्याचे आढळून आले. याची हजारे यांनी विचारना केली.
त्याच वेळी हजारे यांनी निकाळजेसोबत वाद घातला आणि पाच ते सात वेटरांच्या मदतीने लोखंडी रॉड, लाकडी दांड्यांनी हल्ला चढविला. या घटनेत निकाळजेसह त्यांचे नातेवाईक जखमी झाले. याविषयी निकाळजे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला. तर सतीश हजारे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, गुरुवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास ते हॉटेल बंद करीत असताना आरोपींनी त्यांच्याकडे दारूची मागणी केली. यावेळी वेळ संपल्यामुळे दुकान बंद झाल्याचे सांगितले. याचा राग आल्याने सिद्धार्थ निकाळजे आणि सोबतच्या सात ते आठ जणांनी त्यांच्यासह हजारे यांचा भाऊ, वेटर अनिल जाधव यांना शिवीगाळ करून लाकडी दांडे, रॉडने हल्ला करून जखमी केले. यात अनिल जाधव हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
याविषयी हजारे यांनी तक्रार नोंदविली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुंडलिकनगर ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक कापसे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलविले.