व्यापार, शिक्षण आणि गुंतवणुकीसाठी अमेरिकेत मोठ्या संधी...
By Admin | Published: October 7, 2016 12:45 AM2016-10-07T00:45:56+5:302016-10-07T01:30:47+5:30
औरंगाबाद : भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचे संबंध बळावले असल्याने येणाऱ्या काळात दोन्ही देशांतील व्यापार हा ५०० अब्ज डॉलरच्या घरात जाणार असून,
औरंगाबाद : भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचे संबंध बळावले असल्याने येणाऱ्या काळात दोन्ही देशांतील व्यापार हा ५०० अब्ज डॉलरच्या घरात जाणार असून, भारतीय नागरिकांना अमेरिकेत व्यापार, शिक्षण, पर्यटन आणि गुंतवणुकीमध्ये मोठ्या संधी असल्याचे मुंबईतील अमेरिकन वकिलातीतील (कॉन्सुलेट जनरल) महासंचालक थॉमस वायडा यांनी औरंगाबादेतील पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले.
अमेरिकन कॉन्सुलेट आणि सीआयआय (कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रीज) च्या सहकार्याने औरंगाबादमधील नागरिक, पर्यटक आणि विद्यार्थ्यांसाठी ‘यूएसए टू गो’ हा उपक्रम घेण्यात आला. ताज विवांता येथे झालेल्या या कार्यक्रमाला शहरातील विविध संस्थांतील विद्यार्थी तसेच नागरिक उपस्थित होते. ‘यूएसए टू गो’ सारखे कार्यक्रम हे भारताला अमेरिकेच्या अधिक जवळ नेतात. दोन्ही देशांत विशेष हॉटलाईनही सुरू आहे. औरंगाबादसारख्या तिसऱ्या टप्प्यातील शहरांत येण्याचे कारण म्हणजे शिक्षण, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राची माहिती विकसित होणाऱ्या शहरांपर्यंत जावी हा उद्देश असल्याचे वायडा यांनी स्पष्ट केले.
भारतातून अमेरिकेत जाणाऱ्यांची संख्या मागील वर्षभराच्या काळात १३ टक्क्यांवरुन २९ टक्क्यांपर्यंत गेल्याचे सांगत वायडा म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात पदवी ते पीएच. डी. अशी मोठी संधी अमेरिकेत आहे. अर्थात गुणवत्ता हा निकष त्यासाठी आहेच. भारतीय नागरिकांना काही कारणांमुळे ‘व्हिसा’ नाकारला जातो. मात्र त्याचे कारण स्पष्ट केले जात नाही, या प्रश्नावर वायडा यांनी हा मुद्दा ‘व्हिसा’ अधिकाऱ्यांशी संबंधित असल्याचे सांगितले. अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान आणि बीपीओ क्षेत्रात भारतीयांना मिळणाऱ्या संधी कमी होत चालल्या आहेत का, या प्रश्नावरही त्यांनी सध्या परिस्थिती ‘स्टेबल’ असल्याचे सांगितले.
निवडणुकीचा परिणाम नाही
अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर भारत आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये काही फरक पडेल का, या मुद्यावर वायडा म्हणाले की, निवडणुकीनंतर ‘व्हाईट हाऊस’ मध्ये कोणीही बसले तरी भारताला अमेरिकेचे मोठे पाठबळ (स्ट्राँग सपोर्ट) राहणारच आहे.
कंपन्यांची पाहणी
या दौऱ्यात त्यांनी येथील जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीला भेट देऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले. जालना येथील महिको कंपनीसही त्यांनी भेट देऊन संकरित बियाणांबाबत माहिती घेतली.
सीआयआयतर्फे चर्चासत्र
शहरातील नागरिक व विद्यार्थ्यांसाठी अमेरिकन कॉन्सुलेट आणि सीआयआयच्या वतीने दोन विषयांवर चर्चासत्र घेण्यात आले. चर्चासत्रात थॉमस वायडा यांनी आपली भूमिका मांडली.
मुंबईतील अमेरिकन कॉन्सुलेट जनरल थॉमस वायडा यांना औरंगाबाद शहराच्या पहिल्याच दौऱ्यात ‘लोडशेडिंग’चा फटका बसला. ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या शहरात हा प्रकार घडल्याने कार्यक्रमासाठी आलेल्या संयोजकांमध्येही अपराधाची भावना निर्माण झाली. येथील ताज विवांता हॉटेलमध्ये सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वायडा यांचा पत्रकारांशी संवाद चालू होता. त्याच सुमारास हॉटेलच्या इतर दोन हॉलमध्ये कॉन्सुलेटच्या इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुंतवणूक, शिक्षण आणि पर्यटन या विषयांवर चर्चासत्र चालू होते. शहरातील उच्चशिक्षित नागरिक आणि व्यापार व उद्योग क्षेत्रातील अनेक व्यक्तींसह विद्यार्थीही उपस्थित होते. सहा वाजण्याच्या सुमारास अचानक वीज गेली. त्यामुळे वायडा यांनी अंधारातच पत्रकारांशी संवाद चालू ठेवला. अडीच- तीन मिनिटांनी वीज आली आणि अर्धा मिनिटातच पुन्हा गेली. काही सेकंदांनी ती परत आली. विजेच्या या लपंडावामुळे कॉन्सुलर जनरलही थोडे विचलित झाले. त्यांच्यासमवेत असणारे मीडिया अधिकाऱ्यांनाही काय करावे हे सुचेनासे झाले. एका महिला अधिकाऱ्याने हॉलचे पडदे उघडले. मात्र, सायंकाळची वेळ असल्याने पुरेसा नैसर्गिक प्रकाशही आत येऊ शकला नाही. यासंदर्भात हॉटेलचे आॅपरेशन अधिकारी गौतम पंड्या म्हणाले की, महावितरणची वीज गेल्याने हा प्रकार झाला. यामध्ये हॉटेल व्यवस्थापनाचा दोष नाही. तर दुसरीकडे महावितरणचे कार्यकारी अभियंता अमित कुलकर्णी यांनी वीज गेल्याचा प्रकार घडलाच नसल्याचे सांगितले. सीआयआयचे उपाध्यक्ष ऋषी बागला यांनी वीज जाण्याच्या प्रकाराबद्दल असमाधान व्यक्त केले. अमेरिकन कॉन्सुलेट जनरल आले असताना असा प्रकार व्हायला नको होता, असे ते म्हणाले.