मोठा दिलासा ! कोरोना टेस्ट, ट्रॅकिंग जास्त, सुदैवाने रुग्ण कमीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 01:04 PM2021-08-03T13:04:04+5:302021-08-03T13:06:33+5:30
औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी १ हजार ८५० लोकांची तपासणी करण्यात आली; परंतु त्यात केवळ ३६ जण कोरोनाबाधित आढळले.
औरंगाबाद : गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्ण घटल्यामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दररोज किमान २ हजार चाचण्या होत आहेत. एका पाॅझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील किमान १५ लोकांची तपासणी केली जात आहे. टेस्ट आणि ट्रॅकिंगचे प्रमाण जास्त असूनही कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले.
औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी १ हजार ८५० लोकांची तपासणी करण्यात आली; परंतु त्यात केवळ ३६ जण कोरोनाबाधित आढळले. त्यानुसार रविवारी जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट अवघा १.९५ टक्के एवढा राहिला; परंतु ही एका दिवसाची स्थिती नाही. औरंगाबादेत गेल्या काही दिवसांपासून रोज पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी ही ५० च्या खालीच राहिली आहे. चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्ण कमी होत असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. मात्र, कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झालेले नाही, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. रोज २ ते ३ हजारांच्या घरात कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. दुसरीकडे, कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण बोटावर मोजता येईल एवढेच आहे.
ग्रामीण भागात तिप्पट रुग्ण
शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रोज जवळपास तिप्पट कोरोना रुग्णांची भर पडत आहे. शहरात रविवारी ९ रुग्णांची वाढ झाली, त्याउलट ग्रामीण भागात २७ रुग्णांची वाढ झाली. त्यामुळेच शहरापेक्षा ग्रामीण भागात सक्रिय रुग्णांची संख्या अधिक आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात चाचण्यांचे प्रमाण कमी आहे. मात्र, याकडे आरोग्य यंत्रणेचे लक्ष जात नसल्याची स्थिती आहे.
हाय रिस्क लोकांचा शोध
कोरोना रुग्णाचे निदान झाल्यानंतर त्याच्या संपर्कातील हाय रिस्क लोकांची चाचणी केली जाते. एका पाॅझिटिव्ह रुग्णामागे किमान १५ ते २० जणांची तपासणी होत आहे. कोरोना चाचण्यांचे प्रमाण कुठेही कमी झालेले नाही. रुग्ण कमी प्रमाणात सापडत आहेत. कोणाला लक्षणे जाणवत असतील, तर त्यांनी स्वत:हून तपासणी करून घेतली पाहिजे.
- डाॅ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा
शहरातील कोरोना तपासणी आणि रुग्ण
तारीख-----चाचण्या------रुग्ण
२७ जुलै---२२७३-----१०
२८ जुलै----२६९४-----११
२९ जुलै ----२३९८----- ५
३० जुलै ----२८६९------१२
३१ जुलै----- २१२१-----११
१ ऑगस्ट-----१३५३-----९