विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! पर्सेंटाईलची अट शिथिल, बी.एस्सी. नर्सिंगला सीईटी देणाऱ्यास प्रवेश
By राम शिनगारे | Published: October 28, 2023 07:36 PM2023-10-28T19:36:10+5:302023-10-28T19:37:12+5:30
५० टक्के पर्सेंटाईलची अट शिथिल; 'आयएनसी'च्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील नर्सिंग महाविद्यालयात प्रवेशासाठी सीईटी परीक्षेतील ५० टक्के पर्सेंटाईलची असलेली अट शिथिल करण्याचा निर्णय इंडियन नर्सिंग कौन्सिलने (आयएनसी) शुक्रवारी घेतला आहे. त्यामुळे राज्यातील नर्सिंग महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या ५ हजार जागांवर ५० टक्के पर्सेंटाईलच्या खाली असलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फक्त सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यासही जागा रिक्त असतील तर प्रवेश मिळणार आहे.
'आयएनसी'कडून बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ६ एप्रिल रोजी गाईडलाइन्स जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार राज्यातील नर्सिंग महाविद्यालयात प्रवेशासाठी एमएच-सीईटीमध्ये विद्यार्थ्यांना किमान ५० टक्के पर्सेंटाईल असलेल्यांनाच नर्सिग अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत होता. मात्र, त्याचवेळी पंजाब राज्यात ही अट शिथिल करण्यात आली होती. राज्यातील १७५ महाविद्यालयांतील ११ हजार जागांपैकी तब्बल ५ हजारांहून जागा रिक्त राहिल्या असताना पर्सेंटाईलच्या अटीमुळे प्रवेश होत नव्हते. तेव्हा खासगी नर्सिंग स्कूल ॲण्ड कॉलेज मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे राज्याच्या वैद्यकीयशिक्षण संचालकांकडे पर्सेंटाईलची अट शिथिल करण्याची मागणी केली.
वैद्यकीयशिक्षण व संशोधन संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी 'आयएनसी'कडे पत्रव्यवहार करीत पर्सेंटाईलची अट शिथिल करण्याची मागणी केली. त्यानुसार 'आयएनसी'कडून २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी असलेली ५० टक्के पर्सेंटाईलची अट शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविषयीचे पत्र इंडियन नर्सिंग कौन्सिलचे सचिव डॉ. सर्वजित कौर यांनी संचालक डॉ. म्हैसेकर यांना पाठविले आहे. त्यामुळे नर्सिंग महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या ५ हजार जागांवर शून्य पर्सेंटाईल असलेल्या विद्यार्थ्यांचेही प्रवेश होणार आहेत.
महाविद्यालयांची खिरापत सुरूच
राज्यात नर्सिंग महाविद्यालयांच्या खिरापतीचे वाटप सुरूच आहे. दररोज नवीन महाविद्यालयांची भर पडत असल्यामुळे जागांची संख्या वाढतच आहे. त्यातच पर्सेंटाईलच्या अटीमुळे हजारो जागा रिक्त राहत आहेत. हा तिढा सोडविण्यासाठी खासगी नर्सिंग स्कूल ॲण्ड कॉलेज मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे पुढाकार घेण्यात आला होता.