अहो आश्चर्यम! शुष्क मराठवाड्यात यंदा फुलली कारवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 05:48 PM2020-09-21T17:48:04+5:302020-09-21T17:50:37+5:30
मराठवाडा तब्बल ६० वर्षांनंतर कारवी फुलल्याचा आनंद घेत आहे. वनस्पतीप्रेमी आणि अभ्यासकांसाठी हा एक आश्चर्याचा सुखद धक्का.
औरंगाबाद : दरवर्षी जुलै ते सप्टेंबर या काळात फुलून पश्चिम घाटाचे सौंदर्य वाढविणारी कारवी यंदा चक्क औट्रम घाटाच्या रूपात शुष्क मराठवाड्यात आढळून आली आहे. वनस्पतीप्रेमी आणि अभ्यासकांसाठी हा एक आश्चर्याचा सुखद धक्का असून, मराठवाडा तब्बल ६० वर्षांनंतर कारवी फुलल्याचा आनंद घेत आहे. लॉकडाऊनमुळे मार्चपासूनच पर्यटकांचा थांबलेला वावर आणि वरुणराजाने मराठवाड्यावर केलेली कृपादृष्टी यामुळे गवताळा येथे ही किमया बघायला मिळत आहे. वनस्पती अभ्यासकांमध्ये विशेष कुतुहलाचा विषय असणाऱ्या कारवीचा शोध नीस या ब्रिटिश अभ्यासकाने लावला हाेता. १९५३ साली अजिंठा परिसरात कारवी फुलल्याचा पुसटसा उल्लेख काही साहित्यांतून आढळतो. त्यानंतर मात्र तसा कोणताही उल्लेख सापडला नसल्याने यंदा फुललेली कारवी विशेष महत्त्वाची असल्याचे वनस्पती अभ्यासक मिलिंद गिरधारी आणि डॉ. किशोर पाठक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
नीळ्या-जांभळ्या रंगाची आकर्षक फुले येणाऱ्या कारवीचे वैशिष्ट्य म्हणजे बी रुजल्यानंतर तब्बल आठव्या वर्षी झाडाला फुले येतात आणि फुले आली की झाडाचे आयुष्य संपून जाते. या फुलांच्या बिया जमिनीत रुजल्या जातात आणि पुन्हा पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यात त्याला अंकुर फुटतो. एकाच ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येत कारवी पाहायला मिळते. कारवीचे अनेक औषधी उपयोग असून, पोटाचे आजार आणि वेदनाशामक औषधी म्हणून कारवी उपयुक्त असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
चौकट :
१. वनविभागाने जतन करण्याची गरज
कारवीप्रमाणेच इतरही अनेक दुर्मिळ झाडे गवताळा येथे आढळून आली आहेत. मात्र, हे वनविभागाच्या गावीही नाही. या झाडांचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे. मोखा, कौशी, पाडळ, हुंब, काकड ही अतिदुर्मिळ झाडे खऱ्या अर्थाने वनसंपत्ती आहे; परंतु याची रोपे वनविभागात तयार होत नाहीत, हे दुर्दैवी आहे. दिव्याखाली अंधार अशी वनविभागाची परिस्थिती असून, दुर्मिळ झाडांच्या संवर्धनासाठी खाजगी नर्सरीप्रमाणेच वनविभागाच्या नर्सरीनेही पुढाकार घ्यावा.
- मिलिंद गिरधारी
वनस्पती अभ्यासक
२. निसर्ग साखळीतील महत्त्व
गवताळा येथे १०-१२ फूट कारवी वाढलेली आहे. कारवीचा सगळा खेळ पावसावर अवलंबून असून, ते झुडपी प्रकारचे झाड आहे. कारवीची जगभरात एकूण ३५० जातींची झाडे आहेत. भारतात ४६ जातींच्या कारवी आढळतात. याची पाने मोठी आणि लांबूनही ओळखू येतात. कारवी अत्यंत आकर्षक असल्याने त्यावर नानाप्रकारचे कीटक आढळून येतात. त्यामुळे कारवी हे निसर्ग साखळीतील अत्यंत महत्त्वाचे झाड असून, त्याचे संवर्धन होण्याची गरज आहे.
- डॉ. किशोर पाठक