म्हैसमाळला ग्रीनको एनर्जी प्रकल्प? दाओसमध्ये झाला १२ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा करार
By बापू सोळुंके | Published: January 28, 2023 01:02 PM2023-01-28T13:02:21+5:302023-01-28T13:02:59+5:30
कंपनीने तीन वर्षांपूर्वीच जिल्ह्यातील म्हैसमाळ (ता. खुलताबाद) आणि सोयगाव तालुक्यातील नायगाव येथे ऊर्जानिर्मिर्तीचे प्रकल्प उभारणीसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव दिला आहे.
- बापू सोळुंके
औरंगाबाद : अपारंपरिक क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रीनको एनर्जी कंपनीने गतसप्ताहात दाओस येथे राज्य सरकारसोबत १२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा करार केला. कंपनीने तीन वर्षांपूर्वीच जिल्ह्यातील म्हैसमाळ (ता. खुलताबाद) आणि सोयगाव तालुक्यातील नायगाव येथे ऊर्जानिर्मिर्तीचे प्रकल्प उभारणीसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव दिला आहे. आता या प्रकल्पांना ग्रीन सिग्नल मिळत असल्याने राज्यसरकारने ग्रीनकोसाेबत करार केल्याची उद्याेगक्षेत्रात चर्चा आहे. नव्या प्रकल्पासाठी सुमारे २ हजार २०० एकर जमिनीची कंपनीला आवश्यकता असून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.
दाओस येथील आंतरराष्ट्रीय इकोनॉमिक फोरममध्ये ग्रीनको एनर्जी या कंपनीसोबत राज्यसरकारने १२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा करार केला. ही कंपनी औरंगाबाद जिल्ह्यात गुंतवणूक करणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. येथील ऑरिक सिटीच्या दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरच्या बिडकीन औद्योगिक पट्ट्यात सुमारे साडेचार ते पाच हजार एकर जमीन उपलब्ध आहे. येथे ग्रीनको एनर्जी येईल असे बोलले जात होते. मात्र या कंपनीला बिडकीन डीएमआयसीमधील महागडी जमीन नकोय. डोंगराळ आणि जेथे मुबलक पाणी आहे, अशा जमिनीवर पवन ऊर्जा आणि जलविद्युत प्रकल्प उभारण्याची कंपनीची तयारी आहे. हे प्रकल्प उभारणीसाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी २०१९ मध्ये म्हैसमाळ आणि सोयगाव तालुक्यातील नायगाव येथील जमिनीची पाहणी करून ती जमीन निवडल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. म्हैसमाळ आणि नायगाव येथील जमिनींपैकी काही जमीन वन विभागाची तर काही जमीन शेतकऱ्यांची आहे.
पाटबंधारे विभागाचा ६० कोटी ४९ लाख ५४ हजारांचे प्रस्तावित बिलाचे कोटेशन पाटबंधारे विभागाने शासनास सादर केलेल्या अहवालात ग्रीनको कंपनीचा प्रस्ताव मंजूर केल्यास ग्रीनको एनर्जीला सिंचन पुनर्स्थापना खर्च ४९ कोटी २६ लाख ३४ हजार २०० रुपये, प्रथम वर्षीची पाणीपट्टी ८ कोटी ४२ लाख ४० हजार रुपये, प्रतिवर्षी भरावी लागणारी पाणीपट्टी २ कोटी ८० लाख ८० हजार असे एकूण पहिल्या टप्प्यात ६० कोटी ४९ लाख ५४ हजार २०० रुपयांचे प्रस्तावित बिलाचे कोटेशन शासनास सादर केले होते.
पाटबंधारे विभागाला प्रस्ताव
बॅकवॉटरमधून पाणी उपसा करून पाइपलाइनद्वारे म्हैसमाळ येथे नेऊन तेथे जलविद्युत निर्मिती करण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाला ग्रीनको कंपनीने सन २०१९ मध्ये दिला होता. या प्रस्तावात त्यांनी .६२ टीएमसी पाण्याची मागणी केली होती. म्हैसमाळ येथे दोन साठवण तलावाची निर्मिती ते करणार आहे. या प्रस्तावानंतर गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे तात्कालीन कार्यकारी संचालक कोहीनकर यांनी शासनास सविस्तर अहवाल पाठविला होता. या प्रस्तावानंतर पुढे सहा महिन्यांनंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि सरकार बदलले. आता पुन्हा ग्रीनको कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी भेट घेतली.
प्रस्ताव आला आहे
ग्रीनको एनर्जी कंपनीचे अधिकारी काही दिवसापूर्वी आमच्याकडे जायकवाडी प्रकल्पातील पाण्यासंबंधी ऊर्जेचा प्रस्ताव घेऊन आले होते. मात्र अद्याप यावर निर्णय झालेला नाही. कंपनीचा काही वर्षांपूर्वीही प्रस्ताव आला होता.
-जयवंत गवळी, मुख्य अभियंता, जलव्यवस्थापन आणि लाभक्षेत्र विकास प्राधिकरण.