‘हळूच या गं लाटा...जागेल भीम माझा’; औरंगाबादमध्ये भीम सैनिकांचे बाबासाहेबांना गाण्यामधून अभिवादन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 05:40 PM2017-12-06T17:40:14+5:302017-12-06T17:53:27+5:30
एकापेक्षा एक सरस गाणी सादर करुन आज विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यानिमित्त माता रमाई समाज सेवा कला संचाच्या कलावंतांनी भडकलगेटचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा परिसर दणाणून सोडला.
औरंगाबाद : एकापेक्षा एक सरस गाणी सादर करुन आज विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यानिमित्त माता रमाई समाज सेवा कला संचाच्या कलावंतांनी भडकलगेटचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा परिसर दणाणून सोडला.
सकाळपासूनच या कलावंतांनी पुतळा परिसराचा ताबा घेतला. अगदी दुपारपर्यंत न थकता त्यांनी सेवा बजावली, ती उत्स्फूर्तणे व नि:स्वार्थपणे! वाद्यवृंदाच्या तालात सादर करण्यात आलेली ही गाणी बाबासाहेबांबद्दलचा नितांत आदर व्यक्त करणारी तर होतीच.
' गरीबी जरी त्या संसारात होती,
रमाची भीमाला तरी साथ होती '
हे गाणं सखूबाई साळवे गात होत्या आणि अनेकांच्या डोळ्यात आसवे तरळत होती. प्रख्यात गायिका पंचशीला भालेराव या गोड गळ्याच्या गायिकेनेही उपस्थितांना मंत्रमुग्ध करुन सोडले.
' हळूच या गं लाटा जागेल भीम माझा,
झोपेत शांत आहे कोटी जनांचा राजा '
हे भालेराव यांचं श्रध्दांजली गीत मनाचा ठाव घेऊन गेले.
' शीतलता भीमाची चंदनापरी,
एक चांदणी रमा भीमाच्या घरी '
हे रमार्इंचं थोरवी घेणारं गीत सर्वांनाच भावलं. कव्वालीच्या थाटात गायलेले प्रकाश जाधव यांचं गीत असं....
' बाबा के दर सर झुकाने आये है,
फुलोंकी चादर बिछाने आये है '
कलाबाई हिवराळे यांनी ‘ गुलाबाची गाली वसे गौर गाली.... पिंपळाच्या झाडाखाली आली आम्रपाली’ हे गीत गायिलं. रामदास साळवे यांनी ‘ भीमाचा कायदा’ हे गीत खुबीनं सादर केलं. ज्येष्ठ कवी सिध्दार्थ जाधव यांनी हार्मोनियमवर सर्व गायक कलावंतांना लीलया साथ दिली. विठ्ठल भिवसने, मीनाबाई साळवे, साहेबराव निकाळजे, मधुकर शेजूळ, गौतम आव्हाड, किरण जाधव, राजू येवले या कलावंतांचा यातला सहभाग मोलाच राहिला, अर्थात अधून मधून या कलावंतांवर बक्षीसांचा वर्षावही होत राहिला. एकीकडे बाबासाहेबांसारख्या महामानवाला अभिवादन, जयजयकार आणि त्यात भर या गाण्यांची.... असा मिफाफ आज भडकलगेटवर पहावयास मिळाला.