आनंदोत्सव ! तुताऱ्यांच्या निनादात केले मुलीच्या जन्माचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 11:50 AM2018-06-14T11:50:03+5:302018-06-14T11:52:42+5:30
कन्यारत्न झाले म्हणून भोसले परिवाराकडून करण्यात येणारा आनंदोत्सव पाहून येणारी-जाणारी माणसे आश्चर्य व्यक्त करीत होती.
औरंगाबाद : बुधवारी दुपारी एक-दीडच्या सुमारास गारखेडा परिसरातील मॅटर्निटी होमच्या दारात तुताऱ्या वाजू लागल्या. नवी कोरी गाडी दवाखान्याच्या दारात येऊन उभी ठाकली. बच्चेकंपनी हातात फुगे घेऊन बागडू लागली, हे सर्व चित्र पाहून काय होते आहे, हे पाहण्यासाठी येणारी-जाणारी माणसे थबकत होती आणि कन्यारत्न झाले म्हणून भोसले परिवाराकडून करण्यात येणारा आनंदोत्सव पाहून आश्चर्य व्यक्त करीत होती.
मुलगी झाली म्हणून तिला नाकारणारे, मुलीच्या जन्माने दु:खी होणारे अनेक लोक समाजात आहेत. पहिली मुलगी झाली तर एकवेळ कौतुक होते. मात्र, दुसरी मुलगी झाल्यावर नाराज होणारे बहुसंख्य आहेत. दीपक आणि शीतल भोसले या दाम्पत्यालाही असाच अनुभव आला.त्यांना ११ जून रोजी कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांची मोठी मुलगी वेदिका ही पाच वर्षांची आहे. दुसरी मुलगी झाल्यानंतर दवाखान्यात येणारा प्रत्येक नातेवाईक तसेच मित्रमंडळी अरे मुलगी झाली का... असे म्हणत सांत्वन करायला आल्याप्रमाणे भोसले दाम्पत्याशी संवाद साधत होता.
ही गोष्ट भोसले दाम्पत्याला सारखी खटकत होती. कारण वास्तविक त्यांना दुसरी मुलगी झाल्याचा अत्यानंद झाला होता. मुलगा की मुलगी आहे, यापेक्षा आपले अपत्य सुदृढ आहे, यातच त्यांना आनंद होता. त्यामुळे दुसऱ्या मुलीच्या जन्माने आपण नाराज नसून आनंदी आहोत, हेच सगळ्यांना दाखवून देण्यासाठी त्यांनी जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्याचे ठरविले. बुधवारी बाळाला दवाखान्यातून सुटी मिळाली आणि त्यांनी दवाखान्यापासून ते घरापर्यंत वाजत-गाजत मिरवणूक काढून कन्यारत्न प्राप्तीचा आनंद साजरा केला.
घर आनंदाने उजळून निघेल
आमचे एकत्र कुटुंब असून आमच्या कुटुंबात मुलींना सन्मानाने वागविले जाते. दुसरी नात झाली याचा मला मनापासून आनंद आहे. मला एक आणि माझ्या जाऊबार्इंना दोन अशा आमच्या पिढीत कुटुंबात तीन मुली आहेत. आता या मुलींची जागा माझ्या नाती घेतील आणि घर आनंदाने उजळून टाकतील, अशी आनंददायी प्रतिक्रिया लता भोसले या बाळाच्या आजीने दिली. दवाखान्यात असा प्रसंग पहिल्यांदाच घडला, असे डॉ. सीमा लटुरिया यांनी सांगतले. व्यावसायिक असणाऱ्या भोसले यांनी काही दिवसांपूर्वी चारचाकी बुक केली होती. कन्यारत्न प्राप्तीच्या आनंदोत्सवानिमित्त त्यांनी मुलीला घरी घेऊन जाण्याच्या दिवशी गाडीचा ताबा घेतला आणि नव्या कोऱ्या गाडीतून मुलीला घरी नेले.