मृत्यूचे दु:ख दोनदा कोसळले; अंत्यविधी झाल्याचा नातेवाईकांचा समज झाला अन मृतदेह ४ दिवस घाटीतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 07:59 PM2020-12-09T19:59:01+5:302020-12-09T20:00:30+5:30
सुपर स्पेशालिटीच्या इमारतीत उपचार सुरू असताना ४ डिसेंबर रुग्णाचा मृत्यू झाला.
औरंगाबाद : ७२ वर्षीय कोरोना रुग्णाचा मृतदेह तब्बल ४ दिवस घाटीतील शवागृहातच पडून राहिल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली. अंत्यविधी प्रशासनाकडून केला जाईल म्हणून मृतदेह पाहून नातेवाईक निघून गेले; परंतु मनपाकडून अंत्यविधीची परवानगी आणण्यासाठी नातेवाईकच नसल्याने मृतदेह तसाच राहिला. या प्रकाराविषयी नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. अखेर या मृतदेहावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहानूरवाडी येथील ७२ वर्षीय व्यक्तीस कोरोनाच्या उपचारासाठी २५ नोव्हेंबर रोजी घाटीत दाखल करण्यात आले. सुपर स्पेशालिटीच्या इमारतीत उपचार सुरू असताना ४ डिसेंबर रुग्णाचा मृत्यू झाला. नातेवाईकांना ही माहिती देण्यात आली. रुग्णवाहिकेत मृतदेह पाहून नातेवाईक घाटीतून रवाना झाले. मात्र, मंगळवारी घाटीतून नातेवाईकांना फोन आला आणि रुग्णाचा अंत्यविधी बाकी असून, घाटीत येण्यास सांगण्यात आले. ही बाब ऐकून नातेवाईकांना धक्काच बसला. ४ डिसेंबर रोजी अंत्यविधी झालेला असताना आता पुन्हा का बोलविण्यात आले, ४ तारखेला अन्य व्यक्तीचाच अंत्यविधी झाला का, असा प्रश्न नातेवाईकांना पडला. त्यामुळे त्यांनी घाटीत धाव घेतली. तेव्हा घडलेला प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. मनपाकडून अंत्यविधीची परवानगी आणून अखेर बेगमपुरा स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला.
समन्वय, संवादाचा अभाव
४ तारखेला रात्री ११ वाजता मृत्यूची माहिती देण्यात आली. अंत्यविधी केला जाईल, असे सांगितले; परंतु त्यासाठी मनपाकडून आम्हाला परवानगी आणावी लागते, हे सांगितले नाही. हे जर सांगितले असते तर इतके दिवस वडिलांचा मृतदेह घाटीत राहिला नसता. फोन नंबर दिलेले होते; परंतु घाटीत संवाद, समन्वय नसल्याने हा प्रकार झाल्याचे रुग्णाच्या मुलाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
घाटी प्रशासन म्हणाले...
वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे म्हणाले, नातेवाईकांनी दिलेला माेबाईल क्रमांक लागत नव्हता. अंत्यविधीसाठी मनपाची परवानगी नातेवाईकांना आणावी लागते; परंतु मृतदेह पाहून ते रवाना झाले. त्यामुळे मृतदेह तसाच राहिला.