नवरदेव बोहल्यावर चढला अन् नवरीला आई-वडिलांनीच ठेवले डांबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 05:01 PM2021-11-25T17:01:24+5:302021-11-25T17:02:22+5:30

दोघांनीही पळून जाऊन लग्न केले आहे, नातेवाईकांनी रीतसर लग्न लावून देतो म्हणून बोलावून घेतले आणि ....

Groom is ready but bride was locked in room by her parents | नवरदेव बोहल्यावर चढला अन् नवरीला आई-वडिलांनीच ठेवले डांबून

नवरदेव बोहल्यावर चढला अन् नवरीला आई-वडिलांनीच ठेवले डांबून

googlenewsNext

वैजापूर (औरंगाबाद ) : लग्न म्हटले की धमाल, मौजमजा, मित्रमंडळी, नातेवाइकांतील आनंदाचा क्षण. लग्नाचा दिवस हा वधू-वरांच्या जीवनातील एक अविस्मरणीय अनुभव असतो. मात्र, बुधवारी शहरात आयोजित लग्न समारंभात नवरदेव व त्यांच्या नातेवाइकांना वेगळाच अनुभव आला. नवरीच्या आई-वडिलांनी चक्क मुलीला (वधूला) घरातच डांबून ठेवले. नवरदेवाला हळदीच्या अंगावर पोलीस ठाणे गाठावे लागले. रात्री उशिरापर्यंत यावर तोडगा काही निघाला नव्हता.

तालुक्यातील तिडी येथील एक युवक हा वैजापुरातील महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्यावेळी त्याचे वर्गातील एका युवतीशी प्रेम जुळले. प्रेमाच्या आणाबाका घेत त्यांनी घरच्यांचा विरोध करून विवाह केला. दोघेही घराबाहेर पळून गेले. त्यानंतर त्यांनी रीतसर नोंदणी पद्धतीने विवाह केला. तोपर्यंत मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद वैजापूर पोलीस ठाण्यात केली. मात्र, दोघेही सज्ञान असल्याने नातेवाईक काही करू शकले नाही. मुला-मुलीने पळून जाऊन लग्न केल्याची खंत दोघांच्या आई-वडिलांना होती. समाजात व नातेवाइकांत बदनामी होईल. म्हणून त्यांनी समेट घडवून आणला. दोघांच्या नातेवाइकांच्या उपस्थितीत रीतसर लग्न लावण्याचा निर्णय कुटुंबीयांकडून घेतला गेला. बुधवारी लग्नाची तारीख होती. दोन्ही कुटुंबीयांनी सर्व नातेवाइकांना आमंत्रण देऊन लग्नाला पाचारण केले. वैजापुरात विवाह सोहळ्याचे आयोजन केलेले होते. सकाळपासूनच दोन्ही बाजूंच्या नातेवाइकांची धावपळ सुरू होती. मित्र, सगेसोयरे, मामा, मावशी व मित्रमंडळी भेटवस्तूंसह लग्नाला हजर झाली. मंडप, जेवणाचीही जोरदार तयारी सुरू होती. पाहुणे मंडळी जेवणाचा आस्वाद घेत होते. नवरदेवालाही हळद लावून सजविण्यात आले होते. नवरदेवाची मिरवणूक काढून तो मंडपात आला. बोहल्यावर चढण्यासाठी तो सज्ज असतानाच भलतेच घडले. मुलीच्या आई-वडिलांनी चक्क मुलीला डांबून ठेवत लग्नास नकार दिला.

...अन् नवरदेवाने पोलीस ठाणे गाठले !
नवरदेव बोहल्यावर चढला होता. काही वेळातच लग्न लागणार होते; परंतु वधूच्या आई-वडिलांनी तिला घराबाहेर पडूच दिले नाही. आम्हाला लग्न नाही करायचे, अशी भूमिका मुलीचे आई-वडील व नातेवाइकांनी घेतली. त्यामुळे हळद लावून बसलेल्या नवरदेवाच्या पायाखालची वाळू सरकली. आपण फसलो गेल्याचे नवरदेव व नातेवाइकांच्या लक्षात आले. त्यानंतर हळदीच्या अंगावरच नवरदेवाने नातेवाइकांसह पोलीस ठाणे गाठले. रात्री उशिरापर्यंत वऱ्हाडी मंडळींनी वैजापूर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. मात्र, पोलिसांनी हात झटकले. तसेच मुलीच्या आई-वडिलांनी मुलीला घराबाहेरच पडू दिले नाही. त्यामुळे काही नातेवाइकांनी घरी काढता पाय घेतला. रात्री उशिरापर्यंत या विवाहाबाबत तोडगा निघाला नव्हता.

Web Title: Groom is ready but bride was locked in room by her parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.