फसवणुकीचा फंडा ! पर्यटनस्थळी नवरदेव तिकीट काढण्यास गेला, इकडे नववधू दागिने घेऊन फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 04:45 PM2022-04-05T16:45:58+5:302022-04-05T16:47:01+5:30
मध्यस्थ दोघेही नवरदेवाकडील नातेवाईकांचे फोनघेणेही टाळत आहेत.
- सुनील घोडके
खुलताबाद: लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी दौलताबाद किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेली नववधू नवरदेवाला सोडून फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २९ मार्च रोजी झाली असून या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पूर्वी कुठलीही ओळख नसताना केवळ मध्यस्थीने झालेला विवाह औटघटकेचा ठरलाच पण दागिने आणि पैस्यांची फसवणूकही झाल्याने नवरदेवाकडील मंडळीत संताप व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खुलताबाद तालुक्यातील मावसाळा येथील राजेश प्रकाश लाटे या मुलास बबन म्हस्के ( रा. जळगाव ) व आशाबाई भोरे (मुलीची मावशी, रा. अंजनगाव सुर्जी जि. अमरावती) यांनी लग्नासाठी जळगाव येथील मुलीचे स्थळ आणले. बोलणी झाल्यानंतर शुभांगी प्रभाकर शिंदे या मुलीसोबत राजेशचे २६ मार्च २०२२ रोजी दौलताबाद येथील दत्तमंदीरात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न पार पडले. लग्नासांठी नवरदेवाच्या नातेवाईकांनी मुलींच्या नातेवाईकांना १ लाख ३० हजार रूपये रोख दिले. तसेच लग्नात नवरी मुलीच्या अंगावर ७० हजार रूपयांचे दागदागिणे घातले. लग्नखर्च ही मुलाकडील नातेवाईकांनी केला. त्यानंतर नवरदेव - नवरी २७ मार्च रोजी सातारा खंडोबा, खुलताबाद, वेरूळ आदी ठिकाणी देवदर्शनही करून आले. तर २९ मार्च रोजी नवरदेव - नवरी यांच्या विवाहनिमित्त सत्यनारायण महापुजा करण्यात आली. त्यानंतर दोघेही दौलताबाद येथील देवगिरी किल्ला पाहण्यासाठी गेले.
यावेळी नवरदेव राजेश किल्ला परिसरात तिकीट काढण्यासाठी गेला. तिकीट काढून परत आला असता नवरी जागेवर नव्हती. शोध घेतला असता नववधू एका बोलेरा गाडीतून फरार झाली. राजेशने मध्यस्थ आशाबाई भोरे व बबन म्हस्के यांना नववधू पळून गेल्याचे सांगितले. त्यानंतर दोघेही नवरदेवाच्या नातेवाईकांचे फोनघेणे ही टाळत आहेत. लग्नाचे खोटे नाटक करून १ लाख ३० हजार रूपये लुबाडून, ७० हजारांचे ऐवज घेवून नववधू फरार झाल्याची तक्रार दौलताबाद पोलीस ठाण्यात नवरदेवा ने दिली. या प्रकरणी पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नसल्याचा आरोप मुलाच्या नातेवाईकांनी केली आहे.