औरंगाबाद जिल्ह्यातील भूजलपातळी मोठ्या प्रमाणात खालावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 07:12 PM2018-11-21T19:12:37+5:302018-11-21T19:14:29+5:30
भूवैज्ञानिकांनी केलेल्या विश्लेषणावरून पाणीपातळीत मोठी घट झाल्याचे दिसते आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यातील भूजलपातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. नऊपैकी एकाही तालुक्यातील पाण्याचे प्रमाण वाढले नसल्यामुळे येणाऱ्या काळात जलसंकटाचा सामना ग्रामीण भागातील नागरिकांना करावा लागणार आहे. पर्जन्यमान आणि विहिरींतील निरीक्षणाच्या आधारे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी केलेल्या विश्लेषणावरून पाणीपातळीत मोठी घट झाल्याचे दिसते आहे.
भूवैज्ञानिकांनी भूजलपातळीच्या निरीक्षण विश्लेषणानुसार जिल्ह्यातील एकाही तालुक्यात पाणीपातळी वाढलेली नाही. सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यांत केलेल्या माहिती संकलनाआधारे मागील पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी पाणीपातळी खोलवर गेली आहे. १४१ विहिरींचे निरीक्षण भूवैज्ञानिकांनी नोंदविले. त्या सर्व विहिरींचा विचार केला असता सरासरी ८.७५ इतकी स्थिर भूजलपातळी जिल्ह्यात आहे. १३५ विहिरींच्या निरीक्षणाचा विचार केला तर तेथील पाणीपातळी घटली आहे. फक्त ६ विहिरींमध्ये पाणीपातळी वाढलेली आढळून आली असून, त्यात औरंगाबाद तालुक्यातील तीन, वैजापूरमधील १ आणि सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील प्रत्येकी एका विहिरीचा समावेश आहे.
तालुक्याचे विहिरींची घट झालेल्या
नाव संख्या विहिरींची संख्या
औरंगाबाद १६ १३
फुलंब्री १३ १३
पैठण २० २०
गंगापूर १७ १७
वैजापूर १६ १५
खुलताबाद ०४ ०४
सिल्लोड १९ १८
कन्नड १८ १८
सोयगाव १८ १७
एकूण १४१ १३५