कोरोना रुग्णांसाठी देवदूत बनला तरुणांचा ग्रुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:06 AM2021-05-05T04:06:24+5:302021-05-05T04:06:24+5:30
औरंगाबाद : कोरोनाचे संकट मनाचा थरकाप उडवून देणारे आहे. दवाखान्यात बेड उपलब्ध नाहीत. या महामारीला बळी पडणाऱ्या रुग्णांची संख्या ...
औरंगाबाद : कोरोनाचे संकट मनाचा थरकाप उडवून देणारे आहे. दवाखान्यात बेड उपलब्ध नाहीत. या महामारीला बळी पडणाऱ्या रुग्णांची संख्या कमी व्हायचे घेत नाही. स्मशानभूमीत ‘वेटिंग’ सुरू आहे. सर्वत्र अस्वस्थ करणारे वातावरण असताना औरंगाबादेतील काही उच्चशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा देण्याचा विडा उचलला आहे. ‘सेहत इझी कोरोना वॉरियर’ या नावाचा तरुणांचा हा ग्रुप कोणतीही अपेक्षा न ठेवता रात्रंदिवस परिश्रम घेत आहे. आठ दिवसांत या ग्रुपने ८०हून अधिक रुग्णांना मदत केली आहे, हे विशेष ! ‘कोणी बेड देता काहो बेड’, अशी मागणी करत शहरातील रुग्णालयांचा धांडोळा घेणारे रुग्ण आणि त्यांचे हतबल नातलग अनेकांनी पाहिले आहेत. उपचारासाठी अनेकजण बाहेरच्या जिल्ह्यांतूनही शहरात येत आहेत. सर्वत्र अस्वस्थता, हतबलता आणि नैराश्यजनक वातावरण आहे. अशा परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून माणुसकी जपणारा तरुणांचा हा ग्रुप आठवडाभरापूर्वी अस्तित्वात आला. आता हा ग्रुप एकट्या औरंगाबादेतच नाही, तर हळूहळू संपूर्ण मराठवाडाभर पसरला आहे.
फार्मसीची पदवी घेतलेल्या सुरेश सोरमारे या तरुणाने सर्वप्रथम सदरील ग्रुपची संकल्पना मांडली. सुरुवातीला या ग्रुपसोबत त्याचे मित्र जोडले गेले आणि आता बघता बघता अनेक निस्वार्थी तरुण या ग्रुपच्या माध्यमातून योगदान देत आहेत. ग्रुपमध्ये वेगवेगळ्या टीम तयार केल्या असून, प्रत्येक टीमकडे वेगळी जबाबदारी देण्यात आली आहे. कोणी रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये बेड, व्हेंटिलेटर उपलब्ध करून घेण्यासाठी परिश्रम घेतो, कोणी रुग्णवाहिकांसाठी, कोणी रुग्णांच्या नातेवाइकांना चहा, नाश्ता, जेवण, औषधी नेऊन देण्याची व्यवस्था करीत आहे, तर कोणी डॉक्टरांच्या संपर्कात राहून दाखल केलेल्या रुग्णांच्या प्रकृतीची दैनंदिन माहिती जाणून घेत आहे. एक टीम ही रुग्ण तसेच नातेवाइकांचे समपुदेशन करत आहे. काहीजण प्लाझ्मा उपलब्ध करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून दाते शोधत आहेत. सोशल मीडियावर मदत मागणाऱ्या रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांना अटेंड करणारी वेगळी टीम आहे.
चौकट....
ठणठणीत बरे होणारे रुग्ण, हीच आमच्या परिश्रमाची पावती
सुरेश सोरमारे म्हणतो, या ग्रुपच्या माध्यमातून ३२ जण परिश्रम घेत आहेत. आठवडाभरात कोविडच्या दोन अत्यवस्थ रुग्णांना व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध करून दिले होते. ते दोनही रुग्ण आता बरे झाले आहेत. आम्ही कोणतीही अपेक्षा न ठेवता विनामूल्य सेवा देत आहोत. आमच्या ग्रुपच्या माध्यमातून ठणठणीत बरे होणारे रुग्ण, हीच आमच्या कामाची पावती आणि मिळणारे लाख मोलाचे समाधान आहे.