जिल्ह्यात लसीकरणाचा वाढता आलेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:02 AM2021-01-25T04:02:21+5:302021-01-25T04:02:21+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात लसीकरणाच्या पाचव्या दिवशी शनिवारी (दि.२३) लसीकरणाचा आलेख काही प्रमाणात वाढला. दिवसभरात १३०० पैकी तब्बल ९३६ ...
औरंगाबाद : जिल्ह्यात लसीकरणाच्या पाचव्या दिवशी शनिवारी (दि.२३) लसीकरणाचा आलेख काही प्रमाणात वाढला. दिवसभरात १३०० पैकी तब्बल ९३६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोस घेतला; मात्र ३६४ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकडे पाठ फिरवली.
शहराच्या महापालिकेच्या ६ लसीकरण केंद्रांसह घाटी रुग्णालयात शनिवारी दिवसभरात ६९४ लाभार्थ्यांना कोविड लस देण्यात आली. गेले चार दिवस प्रत्येक केंद्रांवर दररोज १०० जणांना लस देण्याचे नियोजन केले होते. शहरात शनिवारी त्यात वाढ करण्यात आली. दोन केंद्रांवर प्रत्येकी ३०० आणि २०० जणांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार एकूण ६ केंद्रांवर ९०० जणांना लस देण्याचे नियोजन होते. यात सर्वाधिक २७४ जणांना एमजीएम रुग्णालयातील केंद्रावर लस देण्यात आली. शहरात ७७.११ टक्के लसीकरण झाले, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी दिली. जिल्ह्यात दिवसभरात ९३६ जणांना लसीचा डोस दिल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी दिली. ग्रामीण भागांत लसीकरणाचे प्रमाण वाढल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.
घाटीतील प्रमाण वाढेना
घाटीत नियोजनातील १०० पैकी २८ जणांनीच शनिवारी लस घेतली. यात बालरोग विभागातील डॉक्टरांनीही डोस घेतला. लसीकरणाचा पहिला दिवस वगळता अन्य दिवशी घाटीत रोज ४० पेक्षा कमी आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली.
एकाला रिॲक्शन
शहरातील केंद्रावर एका आरोग्य कर्मचाऱ्यांस लसीकरणानंतर मायनर रिॲक्शनचा त्रास झाला. ताप आणि डोकेदुखी या कर्मचाऱ्यास उद्भवल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.