राज ठाकरेंच्या सभेला वाढता विरोध; झळकले बॅनर, राजकीय पक्ष, संघटनांकडून निवेदनांचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 11:36 AM2022-04-20T11:36:48+5:302022-04-20T11:37:22+5:30
दुसरीकडे १ मेच्या सभेला पोलीस परवानगी मिळावी, यासाठी मनसेने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन अर्ज दिला आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांच्या १ मेच्या सभेविरोधात विविध राजकीय पक्ष, संघटनांनी जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन सभेला परवानगी नाकारण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग, ऑल इंडिया पँथर सेना, प्रहार जनशक्ती पक्ष, गब्बर ॲक्शन कमिटीने मंगळवारी निवेदने देऊन सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली. तसेच शहरातील वर्दळीचे ठिकाण निराला बाजार येथे राज ठाकरे यांनी रेखाटलेल्या जुन्या व्यंगचित्राचे एक बॅनर झळकले आहे. यावरून राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर निशाना साधण्यात आला आहे.
पँथर सेनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ठाकरे यांचे भाषण चिथावणीखोर असते. त्याच्या सभांना आणि भाषणांना राज्यभर बंदी आणावी. त्यांच्या सभेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. निवेदनावर बंटी सदाशिवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मनसेप्रमुख ठाकरे यांच्यासह सर्वच जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या सभा, भाषणांना परवानगी देऊ नये. कोरोनानंतर सर्वसामान्य नागरिक दैनंदिनीचा व्याप सांभाळताना हतबल झालेला आहे. महागाईचा आगडोंब उसळला आहे. अशा परिस्थितीत सामाजिक स्वास्थ्य खराब होणे हे योग्य नाही. निवेदन देताना ॲड. प्रदीप त्रिभुवन, गजानन खंदारे, सतीश हिवराळे, रवि लिंगायत, मुन्ना मावस्कर, अफजल पठाण आदींची उपस्थिती होती. गब्बर ॲक्शन कमिटीने ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्यात येऊ नये, मागणीचे निवेदन पोलीस आयुक्तांना दिले, यावेळी मकसूद अन्सारी, शेख हनीफ बब्बू, इमरान पठाण, हफीज अली, हसन शहा आदींची उपस्थिती होती.
राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे सरचिटणीस सय्यद तौफिक यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन ठाकरे यांनी हिंदू-मुस्लीम समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.
मनसेकडून सभेच्या तयारीला वेग
दुसरीकडे १ मेच्या सभेला पोलीस परवानगी मिळावी, यासाठी मनसेने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन अर्ज दिला आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. दरम्यान, २० एप्रिल रोजी मनसेचे नेते दिलीप धोत्रे, संतोष नागरगोजे, प्रकाश महाजन, अशोक तावरे, सतनामसिंग गुलाटी सभेच्या तयारीनिमित्त सकाळी १० वाजेपासून पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठका येणार आहेत. शहरातील तीन, ग्रामीणमधील सहा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या सुभेदारी विश्रामगृह येथे ते बैठका होतील, असे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, बिपीन नाईक, वैभव मिटकर, आशिष सुरडकर, गजन गौडा यांनी कळविले आहे.