व्यापार क्षेत्रात जीएसटीची युद्धपातळीवर तयारी
By Admin | Published: June 24, 2017 12:34 AM2017-06-24T00:34:30+5:302017-06-24T00:35:44+5:30
औरंगाबाद : गुडस् अॅण्ड सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) ही नवीन करप्रणाली देशभरात लागू होण्यास अवघे ७ दिवस उरले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गुडस् अॅण्ड सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) ही नवीन करप्रणाली देशभरात लागू होण्यास अवघे ७ दिवस उरले आहेत. जीएसटीनुसार आपली कार्यप्रणाली अद्ययावत करण्यात उद्योग व व्यापार क्षेत्रात जोरात तयारी सुरू आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, प्रत्येक वितरक, ग्राहकांना जीएसटीएन नंबर देणे व क्लोजिंग स्टॉकचा हिशेब पूर्ण करण्यापर्यंतची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. यामुळे उद्योग, व्यापार वर्तुळात सध्या प्रत्येक जण ‘जीएसटी’चीच चर्चा करीत आहे.
१ जुलैपासून जीएसटी लागू होणार हे आता स्पष्ट झाले आहे. स्वातंत्र्यानंतरची देशातील सर्वांत मोठी करसुधारणा म्हणून ‘जीएसटी’कडे पाहिले जात आहे. जीएसटीसंदर्भात अनेक बाबतीत अजूनही व्यापारी व उद्योजकांमध्ये संभ्रम असले तरीही कोणत्याही परिस्थितीत १ जुलैपासून जीएसटीनुसार उद्योग व व्यवसायाची कार्यप्रणाली सुरू करावी लागणार असल्याने सर्वजण त्यादृष्टीने कामाला लागले आहेत. उद्योगात ‘युद्धजन्य’ परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषत: अकाउंट विभागात काम करणारे कर्मचारी ‘जीएसटी’ समजून घेण्यात व त्यानुसार सर्व माहिती, हिशेब अद्ययावत करण्यात लागले आहेत. मासिआचे अध्यक्ष सुनील किर्दक यांनी सांगितले की, जीएसटी आत्मसात करण्यासाठी सर्वप्रथम लहान-मोठ्या उद्योगांनी आपल्या कार्यस्थळी कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केली आहेत.