मंत्री भुमरेंच्या दातावर मोबाईल टॉर्चच्या उजेडात उपचार, झटक्यात जनरेटर मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 09:39 AM2022-10-17T09:39:05+5:302022-10-17T09:39:51+5:30
भुमरेंच्या उपचारावेळी ५ मिनिटांसाठी लाईट गेल्याने डॉक्टरांसह स्टाफची मोठी तारांबळ उडाली. मात्र, यानंतर पालकमंत्र्यांनी थेट जनरेटर मंजूर केले.
औरंगाबाद - जिल्हयाचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी शुक्रवारी पाहणी करत सरकारी रुग्णालयातील सोयी सुविधांचा आढावा घेतला. याच दौऱ्यात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात त्यांनी आपले दंतोपचार घेतले. या रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी अद्ययावत सुविधा मिळणे गरजेचे आहे. घाटीत पायाभूत सुविधा निर्मितीसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी शुक्रवारी सांगितले. दरम्यान, भुमरेंच्या उपचारावेळी ५ मिनिटांसाठी लाईट गेल्याने डॉक्टरांसह स्टाफची मोठी तारांबळ उडाली. मात्र, यानंतर पालकमंत्र्यांनी थेट जनरेटर मंजूर केले.
भुमरेंनी रुग्णालयात बैठकीही घेतली, त्या बैठकीला आमदार प्रदीप जैस्वाल, घाटी रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.वर्षा रोटे, डॉ.विजय कल्याणकर उपअधिष्ठाता डॉ.एम.एस.बेग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकिरडे, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता श्री. येरेकर, डॉ.शेंडगे, महावितरणचे चिंचनकर यांची उपस्थिती होती. या भेटीदरम्यान भुमरे यांनी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील परिस्थितीचा देखील आढावा घेतला आढावा घेताना त्यांनी आपले दंतोपचार देखील घेतले. भुमरे यांच्या दातांची तपासणी केल्यानंतर हर्सूल केंद्रावरून वीज गेली अन् यंत्रणेची धावपळ उडाली. त्यानंतर तातडीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन लावण्यात आले. तोपर्यंत मोबाइलचे टॉर्च लावून तपासणी केली. अधिष्ठाता डॉ.एस.पी. डांगे म्हणाले, पाच वर्षांपासून जनरेटरचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाकडे पडून आहे. शुक्रवारी विजेची समस्या असते.
ज्युबिली पार्क परिसरात वीज गेल्यास अथवा काही अडचण झाल्यास वीज गुल होते. त्यामुळे आम्ही जनरेटरचा प्रस्ताव दिला आहे. इतर फीडरवरून आणखी वीज कनेक्शन दिल्यास चोवीस तास वीज मिळू शकते. पालकमंत्र्यांनी आता तात्पुरते जनरेटर उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. शासकीय दंत महाविद्यालयात मराठवाडा विकास मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष दंत उपचारासाठी आले होते. त्यांना दुसऱ्या मजल्यावर जावे लागले होते. त्यावेळी लिप्टची सुविधा नव्हती. त्या नेत्यांनी पाठपुरावा केल्यानंतर लिप्ट सुरू झाल्याची आठवण यावेळी डॉक्टरांनी सांगितली.
दरम्यान, पालकमंत्र्यांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेतल्याने सरकारी रुग्णालयांवरचा विश्वास वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.