पालकमंत्र्यांनी घेतला घाटी रुग्णालयाचा आढावा; चिठ्ठीमुक्त घाटीसाठी प्रयत्नाची ग्वाही
By योगेश पायघन | Published: October 14, 2022 05:22 PM2022-10-14T17:22:22+5:302022-10-14T17:22:30+5:30
संदिपान भुमरे यांनी पालकमंत्री झाल्यावर पहिल्यांदा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची शुक्रवारी पाहणी केली.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयाच्या वाहनतळाचा प्रश्न सोडवण्यासाठी बहुमजली पार्किंग इमारत, नर्सिंग कॉलेजच्या नव्या इमारतीसाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या बैठकीत प्रयत्न करू. स्थानिक असल्याने येथील अडचणी माहिती असून, घाटी रुग्णालय चिठ्ठीमुक्त (प्रिस्क्रिप्शन फ्री) करण्यासोबत विकासासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही पालकमंत्री संदीपान भुमरे येथे दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची भुमरे यांनी पालकमंत्री झाल्यावर पहिल्यांदा शुक्रवारी पाहणी केली. त्यावेळी आ. प्रदीप जैस्वाल, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, उपाधिष्ठाता डाॅ. सिराझ बेग, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कल्याणकर, उपाधीक्षक डाॅ. विकास राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे के. एम. आय. सय्यद, यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते. पाहणीनंतर अधिष्ठाता डाॅ. वर्षा रोटे-कागीनाळकर यांनी घाटीच्या मागण्या व अडचणींचे सादरीकरण केले. त्याचा पाठपुरावा करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंत्री भुमरे यांनी बैठकीत दिली.
हाफकिनकडून पुरवठ्यात अडचण, मंत्रिमंडळातही चर्चा
हाफकिन महामंडळाकडे यंत्र, औषधीसाठी निधी वर्ग करूनही त्याचा वर्षानुवर्षे पुरवठा होत नाही, ही राज्यभरातील अडचण आहे. त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली; तसेच जिल्हा नियोजनातून दिलेल्या निधीची स्थानिक स्थरावर खरेदीसाठी प्रयत्न करू. मंत्री भुमरे यांनी सांगितले.
२०.३८ कोटींच्या २७४ यंत्रांची प्रतीक्षा
घाटीने गेल्या पाच वर्षांत ३२.९२ कोटी रुपये ३१७ यंत्रांसाठी हाफकिनकडे निधी वर्ग केला. त्यापैकी केवळ ४३ यंत्र मिळाले असून, २०.३८ कोटींच्या २७४ यंत्रांचा पुरावठा अद्याप झाला नाही. त्याकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले.
सुपरस्पेशालिटी ब्लाॅकचे खाजगीकरण नाही
सुपरस्पेशालिटी ब्लाॅक हा खाजगीकरणाच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा माझ्याही कानावर आली आहे. सुपरस्पेशालिटी पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री व मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू; तसेच या इमारतीचे खाजगीकरण होणार नाही याकडे लक्ष देऊ, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
बिडकीनला होईल घाटीचे ग्रामीण आरोग्य पथक
पैठण येथे असलेले घाटीचे ग्रामीण आरोग्य केंद्र हे ३० खाटांचे आहे. पैठणला आरोग्य विभागाच्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी मी आग्रही असून, येथील ग्रामीण आरोग्य पथक हे बिडकीन येथे हलवण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे पालकमंत्री भुमरे यांनी सांगितले.
समित्या, बांधकामे दिवाळीनंतर
घाटी रुग्णालयाची अभ्यागत समितीची फेरनियुक्ती लवकरच करू. त्यासोबत सर्व समित्या दिवाळीनंतर जाहीर करू. घाटीची संरक्षक भिंत पूर्वी नियोजित केल्यापेक्षा अधिक उंच आणि पूर्ण भिंत बांधण्यासाठी प्रस्ताव सादरीकरणासाठी सूचना केल्या आहेत. संरक्षक भिंत, ड्रेनेज लाईनची कामे दिवाळीनंतर सुरू होतील, असे पालकमंत्री भुमरे यांनी सांगितले.