शहरातील सर्व उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 07:30 PM2022-01-04T19:30:14+5:302022-01-04T19:30:54+5:30
Subhash Desai: क्रांती चौकातील पुलावर पडलेल्या गॅपबाबत तातडीचे निर्देश
औरंगाबाद : शहरातील सर्व उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले.
लोकमतने सोमवारच्या अंकात क्रांती चौक उड्डाणपुलामध्ये धोकादायक गॅप पडल्याचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर त्याचे पडसाद नियोजन समितीच्या बैठकीत उमटले. पालकमंत्र्यांनी क्रांती चौक पुलावर पडलेला गॅप कशामुळे आला आहे, हे तातडीने पाहण्याचे आदेश दिले.
बैठकीत शहरातील लोकप्रतिनिधींनी लोकमतमध्ये आलेले वृत्त पालकमंत्री देसाईंच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर बैठकीला बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी पुलाच्या ऑडिटबाबत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल असल्याचे नमूद केले. तसेच याचिकेच्या अनुषंगाने सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येत असून, १० दिवसांत ते काम संपेल, असे नमूद केले.
शहर व परिसरात सहा उड्डाणपूल आहेत. यामध्ये रेल्वे स्टेशनचा आणि झाल्टा येथील उड्डाणपूल सर्वात जुना आहे. जालना रोडवर सेव्हन हिल्स येथे पहिला उड्डाणपूल बांधण्यात आला. त्यानंतर सिडको, महावीर चौक, मोंढा नाका, क्रांती चौक येथे उड्डाणपूल बांधण्यात आले. संग्रामनगर येथेही उड्डाणपूल बांधला. हे सगळे पूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधले. सुमारे २०० कोटींतून हे सगळे पूल बांधले असून, या पुलांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी अद्याप एमएसआरडीसी व इतर कोणतीही संस्था पुढे आलेली नाही.
हस्तांतरणाची अशी ही टोलवाटोलवी
एमएसआरडीसीच्या सुत्रांनी सांगितले, क्रांती चौक आणि सेव्हन हिल येथील उड्डाणपुलाचा ’लॅबिलिटी’ काळ संपल्यामुळे ते मनपाकडे हस्तांतरित केले आहेत. सिडको, मोंढा नाका, महावीर चौकातील पुलांचा ‘लॅबिलिटी’ काळ अजून संपलेले नाही. तर मनपाच्या सुत्रांनी सांगितले, मनपाकडे एमएसआरडीसीने एकही पूल हस्तांतरित केलेला नाही. तोंडी बोलून पूल हस्तांतरित कुठे होत असतात काय, असा सवालही मनपा सुत्रांनी केला.