पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 01:00 AM2018-02-16T01:00:49+5:302018-02-16T01:00:57+5:30
औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा येथे झालेल्या गारपिटीची पाहणी करुन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिल्लोड : औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा येथे झालेल्या गारपिटीची पाहणी करुन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले.
तालुक्यात झालेल्या गारपिटीने गहू, हरबरा, फळपिकांचे अतोनात नुकसान झाल्याने २०१४ च्या धर्तीवर शेतकºयांना त्वरित आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आ. अब्दुल सत्तार यांनी त्यांच्याकडे केली. सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा येथील शेतकरी विठ्ठल शंकरलाल जैस्वाल यांच्या शेतात गहू व हरभरा पिकांच्या झालेल्या नुकसानाची डॉ. सावंत व आ. अब्दुल सत्तार यांनी संयुक्त पाहणी केली व शेतकºयांशी संवाद साधला. यावेळी आ. अब्दुल सत्तार यांनी मागण्यांचे निवेदन दिले. डॉ. सावंत यांनी प्रशासनाकडून सिल्लोड व सोयगाव तालुक्यात झालेल्या गारपिटीचा आढावा घेतला. गारपिटीचे राज्यावरील हे अस्मानी संकट असून हाताशी आलेला घास यातून हिरावला गेल्याचे ते म्हणाले.
यावेळी जि. प. अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवीदास लोखंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामदास पालोदकर, संचालक दामोदर गव्हाणे, खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन हनिफ मुलतानी, शिवसेना तालुका प्रमुख किशोर अग्रवाल, नगरसेवक सुदर्शन अग्रवाल, माजी नगरसेवक रघुनाथ घडमोडे, यांच्यासह तहसीलदार संतोष गोरड, नायब तहसीलदार संजय सोनवणे आदींसह संबंधित अधिकाºयांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.'२०१४ च्या धर्तीवर शेतकºयांना मदत द्या'
सिल्लोड व सोयगाव तालुक्यात गारपिटीने रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दुष्काळसदृश्य स्थिती, कर्जमाफी, बोंडअळीची समस्या व आताच्या गारपिटीने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. शासनाने गारपिटग्रस्तांना तोकडी मदत जाहीर केली असून ती आम्हाला मान्य नाही. अशाच प्रकारचे अस्मानी संकट २०१४ मध्ये आले होते. त्यावेळी तत्कालीन आघाडी सरकारने प्रत्येक शेतकºयाला भरीव आर्थिक मदत केली होती. त्याच धर्तीवर मदत व विशेष पॅकेज देण्याची मागणी आ. अब्दुल सत्तार यांनी पालकमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे यावेळी केली.