औरंगाबादमध्ये कैदी रुग्णांसाठी घाटी रुग्णालयाची मार्गदर्शिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 03:14 PM2018-07-06T15:14:52+5:302018-07-06T15:19:44+5:30
विविध गुन्ह्यांतील आरोपी असलेल्या कैद्यांची प्रकृती बिघडल्यास त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले जाते. कैदी रुग्ण किती दिवस रुग्णालयात राहावा, याबाबतचे अधिकार ठराविक व्यक्तींकडेच असायचे. या अधिकाराचे विकेंद्रीकरण करून कैदी रुग्ण दाखल करून घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
औरंगाबाद : विविध गुन्ह्यांतील आरोपी असलेल्या कैद्यांची प्रकृती बिघडल्यास त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले जाते. कैदी रुग्ण किती दिवस रुग्णालयात राहावा, याबाबतचे अधिकार ठराविक व्यक्तींकडेच असायचे. या अधिकाराचे विकेंद्रीकरण करून कैदी रुग्ण दाखल करून घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून या कैदी रुग्णाच्या प्रकृतीचा आढावा घेण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ३ जुलै रोजी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीत पोलिसांमार्फत उपचाराकरिता रुग्णालयात दाखल होणाऱ्या कैदी रुग्णांसाठी मार्गदर्शिका तयार करण्यात आली. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, न्याय वैद्यकीयशास्त्र विभागप्रमुख डॉ. कैलास झिने, डॉ. सय्यद अश्फाक, डॉ. गजानन सुरवाडे, डॉ. प्रभाकर जिरवणकर, डॉ. उद्धव खैरे, डॉ. विजय गायकवाड, डॉ. विकास राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कैदी रुग्णांना विशेष सुविधा मिळत असल्याचा आरोप सर्व स्तरावरून सुरूझाल्याने हा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यामुळे याची गंभीर दखल घेत कैदी रुग्णांना उपचार देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
समितीच्या अध्यक्षपदी वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या गैरहजेरीमध्ये आरएमओ हे काम पाहणार आहेत. सदस्य म्हणून न्याय वैद्यकशास्त्र विभागप्रमुख, शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख, औषधवैद्यकशास्त्र विभागप्रमुख आणि संबंधित विभागाचे पथकप्रमुख काम पाहणार आहेत.
समितीची असेल ही जबाबदारी
कैदी रुग्ण घाटीत दाखल झाल्याबाबत समिती अध्यक्षांना कळविणे बंधनकारक असेल. त्यांच्या गैरहजेरीत आरएमओ यांना माहिती द्यावी लागणार आहे. कैदी रुग्ण हा वॉर्ड क्रमांक १० मध्ये दाखल करणे बंधनकारक असेल. कैदी रुग्ण अत्यवस्थ असेल तर पथकप्रमुखांनी त्याला जनरल वॉर्डमध्ये असल्यास याच्या इत्थंभूत नोंदी कैदी रुग्णाच्या केसपेपरवर करणे आवश्यक राहील. ४८ तासांपेक्षा जास्त कैदी रुग्ण उपचार घेण्यासाठी भरती राहत असेल तर समिती अध्यक्षांना कळवून समितीची बैठक घेणे बंधनकारक असणार आहे. कैदी रुग्ण भरती झाल्यानंतर दर तीन दिवसांनी कैदी रुग्ण समितीने बैठक घेऊन कैद्यांच्या उपचाराबाबत, भरतीस आवश्यक तो निर्णय समितीला घ्यावा लागणार आहे.
कैदी रुग्ण घाटी रुग्णालयात दाखल करून घेण्याबाबत मार्गदर्शिका तयार करण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली कैदी रुग्ण समितीही स्थापन केली आहे. कैदी रुग्णांबाबतच्या निर्णयाचे अधिकार समितीला देण्यात आले आहेत.
- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद.