गुजरातच्या उद्योजकाने १ कोटी ४ लाखांना फसवले, कापसाची खरेदी करून पैसे दिले नाहीत
By राम शिनगारे | Published: May 19, 2024 06:16 PM2024-05-19T18:16:34+5:302024-05-19T18:16:46+5:30
एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : कापसाचा व्यवसाय करणाऱ्या शहरातील व्यापाऱ्याकडून गुजरातच्या एका उद्योजकाने ५६ लाख ८१ हजार १०३ रुपयांचा कापूस ऑगस्ट २०१९ मध्ये विकत घेतला. हा कापूस दुसऱ्याला विकून पैसेही घेतले. मात्र, ज्यांच्याकडून खरेदी केला, त्यांना पाच वर्ष उलटले तरी पैसे दिले नाहीत. मालाची मुळ रक्कम व त्यावरील व्याज ४८ लाख १ हजार ५४४ रुपये असे मिळून १ कोटी ४ लाख ८२ हजार ६४७ रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक गौतम पातारे यांनी दिली.
अहमदाबाद येथील ऋषी रुद्रा ट्रेडींगचे भरतकुमार पुरुषोत्तमदास पटेल असे फसवणूक केलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी संजय त्रिलोकचंद अग्रवाल (४२ रा. एमआयडीसी चिकलठाणा) यांची ऋषि फायबर्स नावाची कापसाचा व्यापार करणारी कंपनी आहे. या कंपनीने १८ जुलै ते ५ ऑगस्ट २०१९ दरम्यान चार वेळा ५६ लाख ८१ हजार १०३ रुपयांचा माल आरोपी पटेलच्या कंपनीला दिला. ठरलेल्या व्यवहारानुसार मालाचे पैसे १५ दिवसांच्या आत न दिल्यास १५ टक्के व्याजाने पैसे द्यावे लागणार होते. आरोपीकडे मालाचे पैसे मागितले असता, त्याने टाळाटाळ सुरू केली. तेव्हा त्याच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. तेव्हा आरोपी पटेल याने चारपैकी एकाच वेळी माल मिळाल्याचे सांगितले. मात्र, त्यास माल दिलेल्याचे सर्व पुरावे सादर केले. तरीही त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपीचा पैसे बुडविण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट झाले.
आरोपीला दिलेल्या मालाविषयी अधिक माहिती घेतली असता, त्याने तो माल इतर व्यापाऱ्यांना अधिकच्या पैशाने विकला असल्याचेही उघडकीस आले. एवढेच नव्हे तर त्याने दिलेल्या मालावरील जीएसटीचा परतावाही आरोपी व त्याच्या कंपनीने घेतल्याचे उघडकीस आले. त्यामुळे अखेर आरोपीच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक गौतम पातारे करीत आहेत.
बनावट लेजर केले तयार
आरोपीने माल मिळाला नसल्याचे दाखविण्यासाठी खोटे व बनावट लेजर तयार करून त्यावर खोट्या नोंदी घेऊन तो माल इतरांना विकला आहे. त्या मालाचे पैसेही स्वत:च हडप केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.