राज्यातील नशेच्या रॅकेटचे पुन्हा ‘गुजरात कनेक्शन’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 06:38 AM2023-11-25T06:38:53+5:302023-11-25T06:40:01+5:30
सुरतचे दाम्पत्य गुन्हेगारांना पुरवते नशेसाठी औषधे
लोकमत न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : महिनाभरापूर्वीच्या शहरातील ड्रग्ज फॅक्टरीत गुजरात राज्यातील ड्रग्ज माफियांचा संबंध स्पष्ट झाला होता. आता पुन्हा सुरतचे एक दाम्पत्य शहरातील गुन्हेगारांना नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या व पातळ औषधांचा पुरवठा करत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. शेख आसमा व शेख फरहान अशी त्या संशयितांची नावे आहेत.
गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विशाल बोडखे यांना कुख्यात गुन्हेगार शेख नदीम शेख नईम याच्याकडे नुकताच नशेच्या औषधांचा साठा आल्याची माहिती मिळाली. निरीक्षक संदीप गुरमे यांच्या सूचनेवरून त्यांनी सहायक निरीक्षक सुधीर वाघ यांच्यासह सापळा रचला.
महिनाभरापूर्वीच दोन्ही भाऊ अटकेत
नदीम हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर १० गुन्हे दाखल आहेत. एनडीपीएस पथकाने २० ऑक्टोबर रेाजी त्याचे दोन भाऊ शेख नय्यर, शेख चांदपाशा यांना अटक केली होती.
गुन्हेगारांना पुरवठा
नदीमकडे आढळलेल्या औषधांमध्ये हिमाचल प्रदेश व मध्य प्रदेशातील औषधी कंपन्यात निर्मिती झालेली औषधे आहेत. त्याचा नशेसाठी वापर होतो.
दोन भावांना अटक झाल्यानंतर नदीमने सुरतच्या दाम्पत्याला ऑर्डर देऊन विक्री सुरू केली होती.
दोघेच शहरात अनेक गुन्हेगारांना हा साठा पुरवत असल्याचेही नदीमने चौकशीत सांगितले.
यापूर्वी जिन्सीत पकडला गेलेला रिक्षाचालकही गुजरातमधून औषध आणत
होता.