अमली पदार्थांचा ‘गुजरात पॅटर्न’! पैसा मालकाचा, डोके जितेशकुमारचे; फॉर्म्युला देऊन पावडर निर्मिती
By सुमित डोळे | Published: October 24, 2023 09:56 AM2023-10-24T09:56:10+5:302023-10-24T09:57:06+5:30
‘प्रोडक्शनचा सेटअप’ जितेशकुमारने उभा करून द्यायचा, अशी ही भागीदारी होती.
सुमित डोळे, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : काही वर्षांपूर्वी शहरात स्थायिक झालेला जितेशकुमार हिन्होरीया प्रेमजीभाई (वय ४४) हा अमली पदार्थांच्या उत्पादनाचा तज्ज्ञ आहे. कंपनीमालक कंपनी उभारून पैसा पुरवायचा व ‘प्रोडक्शनचा सेटअप’ जितेशकुमारने उभा करून द्यायचा, अशी ही भागीदारी होती.
पैठणच्या कंपनीसह अन्य काही कंपन्यांना फॉर्म्युला देऊन पावडर निर्मितीची प्रक्रिया त्यानेच उभी करून देत जिल्ह्यात अमली पदार्थांच्या ‘गुजरात पॅटर्न’चा प्रारंभ केला होता. चार ते पाचजणांना त्याने हा सेटअप उभा करून दिल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. वाळुजच्या ‘त्या’ कंपनीची सोमवारी तपासणी झाली असून, आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये पकडलेल्या ड्रग्स पेडलरच्या चौकशीत जितेशकुमारची माहिती मिळाली होती.
कारखान्याची संकल्पना जितेशकुमारचीच
जितेशकुमार मेफेड्रोन, कोकेनची निर्मिती-विक्री करीत होता. शहरात २ वर्षांत १.०६० ग्रॅम मेफेड्रोन, ३३७.१८ ग्रॅम चरस आढळून आले. सहसा त्याची तस्करी मुंबईवरून होते. मात्र, मेफेड्रोन, कोकेनची निर्मितीच शहरात होईल याचा पुसटसा अंदाजही कोणाला नव्हता.
पत्नी कंपनीत भागीदार
महालक्ष्मी कंपनीचे पूर्ण सेटअप जितेशने कमावतला उभारून दिले होते. या कंपनीत जितेशची पत्नी भागीदार होती, मात्र त्यानंतर तिने भागीदारी सोडली, असे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
जितेश बेशुद्ध असावा
येथील कारवाईत डीआरआयच्या पथकाने सोमवारी सकाळी जितेशकुमारला रुग्णालयातून व्हीसीद्वारे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. व्ही. मुसळे यांच्या न्यायालयात हजर केले. मात्र, जितेशचा आवाज येत नव्हता व तो बेशुद्ध असावा, असे निरीक्षण नोंदवून संबंधित अधिकाऱ्यांना अर्ज दाखल करून त्यांचे म्हणणे सादर करण्याचे न्यायालयाने सूचित केले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी अर्ज दाखल केला. आरोपी न्यायालयात व्यक्तिश: हजर झाल्याशिवाय आदेश करता येणार नसल्याचे न्या. मुसळे यांनी स्पष्ट केले. मात्र, जितेशचा औषधोपचार चालू असेपर्यंत त्याला ‘डीआरआय’ च्या ताब्यात ठेवण्याची परवानगी दिली. जितेशचे वकील ॲड. गोपाल पांडे यांनी सांगितले की, जितेश केमिकल इंजिनिअर आहे. जप्त केलेल्या कच्च्या मालाचा तपासणी अहवाल येईपर्यंत अमली पदार्थाबाबत भाष्य करता येणार नाही. अहवाल आल्यानंतरच योग्य भाष्य करता येईल.
जितेश ३ तास ऑपरेशन थिएटरमध्ये
ड्रग्ज प्रकरणातील आरोपी जितेशकुमार हिन्होरिया याच्या हातावर खोलवर जखम झाली असून, नसांना इजा झाल्याने बोटांच्या कार्यक्षमतेवर किमान वर्षभर तरी परिणाम राहणार आहे. त्याच्या हाताची सोमवारी प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. मानेची शस्त्रक्रिया रात्री उशिरापर्यंत होईल, अशी माहिती एमजीएम रुग्णालयाचे डाॅ. एच. आर. राघवन यांनी दिली. जितेशकुमारने रविवारी काचेने गळा व नस कापण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
..अन् नीतिमत्ता फिरली
- प्रारंभी औषधी कंपनीत नोकरी केलेल्या जितेशकुमारने पावडरच्या निर्मितीचा फॉर्म्युला कंपनी मालकांना दिला.
- त्यात अमाप उत्पन्न पाहून कमावत व अन्य कंपनी चालकांची नीतिमत्ता फिरली. दोघांनी पैसे लावून सामान्य औषधी कंपनीच्या नावाखाली कारखाने उभे केले.
- कंपनीतून उत्पादित होणारे अमली पदार्थ स्थानिक पातळीवर किरकोळ प्रमाणात विकायचेच नाहीत, हा यांचा प्रमुख नियम आहे. मोठ्या ऑर्डरनुसार ते त्याची थेट राज्याबाहेर तस्करी करायचे.