गुजरातच्या फायनान्ससरने भाजप पदाधिकाऱ्यास १८ लाखांना गंडवले
By राम शिनगारे | Published: November 24, 2022 07:27 PM2022-11-24T19:27:00+5:302022-11-24T19:28:12+5:30
उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
औरंगाबाद : शिक्षण संस्था खरेदीसाठी ५० कोटी रुपये कर्ज देण्याच्या अमिषाने गुजरातच्या फायनान्सरने भाजपचे जिल्हा सरचिटणीस तुषार शिसोदे यांची १७ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी गुजरातच्या तीन जणांवर उस्मानपुरा पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा नोंदविला आहे.
विकास शहा, दिपेश दिनेश चौधरी आणि नवनित सिंग (सर्व रा. भावनगर, गुजरात) अशी आरोपींची नावे आहेत. भाजप जिल्हा सरचिटणीस तुषार शिसोदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना सातारा जिल्ह्यातील गौरी शंकर ऐज्युकेशन साेसायटी ही संस्था विकत घ्यायची होती. त्यासाठी ५० कोटी रुपये कर्जाची आवश्यकता होती. ठाण्यातील एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातुन नवनीतसिंग याची ओळख झाली. त्याने विकास शहा हा अहमदाबादेतील मोठा फायनान्सर आहे. तो ५० कोटी रुपये कर्ज देईल, असे सांगितले. त्यानुसार शिसोदे हे २ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे शहा व दिपेश चौधरी याना भेटले. तेव्हा त्यांना ५० कोटी रुपये कर्ज देण्यास दोघांनी होकार दिला. ५० कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटीचे १७ लाख ७५ हजार रुपये डीसी इंटरप्राईजच्या बँक खात्यात जमा केल्यानंतर वकिलाच्या माध्यमातुन ॲग्रीमेंट केले जाईल असे सांगितले. त्यासाठी ६ ऑक्टोबर रोजी पुन्हा येण्याची सूचना दिली. त्यानुसार शिसोदे व त्यांच्या ठाण्यातील मित्र ६ ऑक्टोबर रोजी पुन्हा अहमदाबादला पोहचले. शहा याने सांगितल्याप्रमाणे त्याच्या डीसी इंटरप्राईजच्या बँक खात्यात शिसोदे यांच्या खात्यातुन १७ लाख ७५ हजार रुपये आरटीजीएस केले. त्यानंतर शहा हा वकिलाला घेऊन येतो अशी थाप मारून निघुन गेल्यानंतर परत आलाच नाही.
तिघांचे मोबाईल फोन बंद
फिर्यादी शिसोदे यांनी बॅक खात्यातुन पैसे आरटीजीएस केल्यानंतर आरोपी शहा वकिलाला घेऊन परत येतो, असे सांगुन निघुन गेल्यानंतर सायंकाळी ६ वाजेपर्यंत शिसोदे कार्यालयाच्या दारातच बसले. त्यांनी तिन्ही आरोपींना वारंवार फोन केला मात्र, त्याचे मोबाईल बंद येत होते. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे शिसोदे यांच्या लक्षात आले. या प्रकरणी निरीक्षक गिता बागवडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक प्रविण वाघ तपास करीत आहेत.