बंदुकीची गोळी लागून सैनिकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2017 03:06 AM2017-01-22T03:06:58+5:302017-01-22T03:06:58+5:30
वाशिम जिल्ह्यातील घटना; आत्महत्या की घातपात?
कारंजा लाड (जि. वाशिम), दि. २१- काही दिवसांसाठी रजेवर आलेल्या ३२ वर्षीय सैनिकाचा गोळी लागल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवार २१ जानेवारी रोजी रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास घडली. योगेश प्रभूदास इंगळे असे मृतक सैनिकाचे नाव आहे.
कारंजा शहरातील माळीपुरा भागात राहणारा आणि भारतीय सैनात कार्यरत असलेला योगेश इंगळे १३ दिवसांच्या रजेवर घरी आला होता. शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास त्याच्याकडील बंदुकीची गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले आणि शहर पोलिस स्टेशनच्या प्रभारी ठाणेदार सोनाली गुल्हाने यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. योगेश हा त्याची बंदूक साफ करीत असताना त्याला गोळी लागल्याची चर्चा असली तरी, वृत्त लिहित असेपर्यंत त्याच्या नातेवाईकांकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने त्याने आत्महत्या केली, की त्याचा अपघाती मृत्यू झाला, हे निश्चितपणे कळू शकले नाही.