स्नेहाच्या मदतीला धावून आले गुरुजी
By Admin | Published: July 17, 2014 12:52 AM2014-07-17T00:52:29+5:302014-07-17T01:10:05+5:30
लोहारा : प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर बिकट परिस्थितीवर मात करुन लोहारा येथील स्नेहा मठपती या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत उत्तुंग भरारी घेतली.
लोहारा : प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर बिकट परिस्थितीवर मात करुन लोहारा येथील स्नेहा मठपती या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत उत्तुंग भरारी घेतली. मात्र पुढील शिक्षणासाठी आर्थिक चणचण अडसर ठरत होती. यासंदर्भात ‘लोकमत’ ने आवाहनात्मक वृत्त प्रकाशित केले होते. या आवाहनाला तालुक्यातील गुरुजींनी प्रतिसाद देत, स्नेहाच्या मदतीला धावून आले. त्यांनी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. या जोरावरच स्नेहा आता लातूर येथील एका नामांकित महाविद्यालयात पुढील शिक्षण घेत आहे.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत स्नेहा मठपती या विद्यार्थिनीने पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण लोहारा येथेच पूर्ण केले. चौथी आणि सातवीमध्येही स्नेहा शिष्यवृत्तीधारक बनली होती. आई-वडील मोलमजुरी करुन तिच्या शिक्षणाचा खर्च भागवत होते. मात्र स्नेहा जसजशी वरच्या वर्गात जावू लागली तसतसा शिक्षणाचा खर्च वाढत गेला.
मात्र कुठल्याही परिस्थितीत हार मानायची नाही. हे ध्येय उराशी बाळगून आई-वडील संसाराचा गाडा हाकून स्नेहाच्या शिक्षणासाठी पैसा पुरवत असत. दहावीच्या वर्गामध्ये गेल्यानंतर स्नेहाने रात्रीचा दिवस करुन अभ्यास केला. आणि आई-वडिलांच्या अपेक्षाची पूर्ती केली. ९६ टक्के गुण घेत यश संपादन केले. एकीकडे स्नेहाच्या यशाने आनंद झालेला असतानाच दुसरीकडे आई-वडिलांना पुढील शिक्षणाच्या खर्चाची चिंता सतावत होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने आवाहनात्मक वृत्त प्रकाशित केले होते.
‘लोकमत’ने केलेल्या या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा परिषद सदस्या मीरा अविनाश माळी यांनी स्नेहाला दोन वर्षांसाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर केंद्रप्रमुख मनोहर वाघमोडे यांनी स्नेहाच्या वडिलाची भेट घेवून तिला लातूर येथे पुढील शिक्षणासाठी पाठवा असा सल्ला दिला.
मात्र यावेळी स्नेहाच्या वडिलांनी आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचे सांगत, ते आपल्या आवाक्याबाहेर असल्याचे म्हटले होते. त्यावर वाघमोडे यांनी ‘पैशाची चिंता करु नका, मी निधी जमा करतो’ असे सांगत दिलासा दिला. त्यानुसार केंद्रप्रमुख वाघमोडे यांनी पुढाकार घेत, जिल्हा परिषद, खाजगी शाळातील शिक्षकांना मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार ५० हजार रुपये मदत देण्याचे निश्चित झाले. आजवरच ३५ हजार रुपये जमा झाले असून, उर्वरित रक्कमही जमा करण्याचे काम सुरु असल्याचे वाघमोडे म्हणाले. (वार्ताहर)