गुरुजी लागा तयारीला, मराठवाड्यातील 'झेडपी'च्या सर्व शिक्षकांची होणार परीक्षा
By विकास राऊत | Published: December 8, 2022 12:41 PM2022-12-08T12:41:04+5:302022-12-08T12:41:43+5:30
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी, लातूरचे जि. प. सीईओंवर या प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यातील जि. प.च्या सर्व शाळांतील शिक्षकांचे मूल्यांकन व बुद्ध्यांक जाणून घेण्यासाठी एप्रिल २०२३ पर्यंत परीक्षा घेण्यात येणार आहे. लातूर जि. प.चे सीईओे अभिनव गोयल यांनी जिल्ह्यात राबविलेला पथदर्शी प्रकल्प पूर्ण विभागात पॅटर्न म्हणून राबविण्यात येणार आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी हा निर्णय बुधवारी विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी, लातूरचे जि. प. सीईओंवर या प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत विभागातील जिल्हाधिकारी, जि. प. सीईओंची उपस्थिती होती. शिक्षण, आरोग्य, सामाजिक वनीकरणासह अनेक विषयांवर चर्चा झाली. अध्ययन स्तर शोधल्यावर उपाय करण्याचा डाटा समोर येईल. त्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षित करून अपडेट करण्यात येईल.
मुलांचे गणित कच्चे, वाक्यलेखन येत नाही
चौथीमधील मुलांना वाक्यलेखन येत नाही. ३० टक्के विद्यार्थ्यांना येते, ७० टक्के मुलांना येणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थीनिहाय मॉनिटरिंग करण्यात येईल. शास्त्रज्ञ, इतिहास, परमवीरचक्र विजेता, ॲस्ट्रोनॉमी, गणित, क्रीडा, सेल्फ डिफेन्स हे विषय विद्यार्थ्यांना आले पाहिजेत. ऑगस्ट महिन्यांत लातूरमध्ये जि. प. शाळेतील ४५ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार येत नव्हता. आता ८५ टक्के विद्यार्थी गणित सोडविण्यापर्यंत आले आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत १०० टक्क्यांपर्यंत हे प्रमाण जाणे अपेक्षित आहे.
मराठवाड्यात ८ ते १० हजार जि. प. शाळा
ऑगस्ट २०२२ मध्ये लातूर जि. प.ने गुणवत्तावाढीसाठी प्रयोग केला होता. तो प्रयोग मराठवाड्यातील ८ ते १० हजार जि. प. शाळा व ३५ हजारांच्या आसपास शिक्षकांसाठी राबविण्यात येणार आहे. लातूरच्या धर्तीवर पूर्ण विभागात बेसलाईन असेसमेंट करण्यात येणार आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आजची परिस्थिती, चार महिन्यांनंतरच्या परिस्थितीचे मूल्यांकन होईल. ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून शिक्षक, विद्यार्थ्यांचे ट्रेकिंग करण्यात येईल.
शिक्षकांसाठी हजेरीपट बंधनकारक
शिक्षकांसाठी हजेरीपट बंधनकारक करण्याचा प्रयत्न पुढच्या शैक्षणिक वर्षात करण्यात येईल. सॉफ्टवेअर, क्युआर कोडनुसार हजेरी अपडेट करण्यासाठी विचार होऊ शकतो. यंदाच्या शैक्षणिक वर्षातच शिक्षकांची परीक्षा घेण्यात येईल. मूल्यशिक्षणावर फोकस असणार आहे. प्रत्येक शाळेत लायब्ररी, प्रयोगशाळा, ॲस्ट्रोनॉमी क्लब आहेत. त्याचा प्रभावीपणे वापर केला जाईल. सध्या जि. प. शाळांमध्ये हा उपक्रम असेल. पुढील टप्प्यात मनपा व अनुदानित शाळांचा विचार होईल. एप्रिल २०२३ मध्ये हा उपक्रम पूर्ण करण्याचे प्रयत्न असतील.