गुरुजींच्या आपसी बदल्यांना मुहूर्त..!
By Admin | Published: May 31, 2016 11:22 PM2016-05-31T23:22:39+5:302016-05-31T23:27:25+5:30
उस्मानाबाद : जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभागातील गुरुजींच्या बदल्या तसेच समायोजनासाठी शासनाने ५ जूनपर्यंत कालावधी दिला होत.
उद्या जिल्हास्तरीय प्रक्रिया : तालुकास्तरीय बदल्या शनिवारी
उस्मानाबाद : जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभागातील गुरुजींच्या बदल्या तसेच समायोजनासाठी शासनाने ५ जूनपर्यंत कालावधी दिला होत. सदरील वाढीव कालावधी सरण्यास अवघे चार ते पाच दिवस उरल्यामुळे उपरोक्त बदली प्रक्रिया होणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला होता. असे असतानाच मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्या आदेशानुसार शिक्षण विभागाने बदल्यांच्या तारखा मंगळवारी जाहीर केल्या. त्यानुसार जिल्हास्तरीय आपसी बदल्या २ जून रोजी तर तालुकास्तरीय प्रशासकीय व विनंती बदल्या ४ जून रोजी केल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे पात्र गुरुजींचा जीव भांड््यात पडला आहे.
प्राथमिक शिक्षण विभाग हा जिल्हा परिषदेतील सर्वाधिक कर्मचारी असणारा विभाग आहे. सुमारे पाच हजारावर अस्थापना आहे. त्यामुळे इतर विभागांच्या तुलनेत बदल्या तसेच समायोजनासाठीही अधिक कालावधी लागतो. १५ मे रोजी जिल्हास्तरीय विनंती बदल्या ठेवण्यात आल्या होत्या. परंतु, ऐन बदल्यांच्या दिवशी ही प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. कारण सदरील प्रक्रिया राबविल्यानंतर भूम, परंडा आणि वाशी या तालुक्यातील मोठ्या प्रमाणात जागा रिक्त होत होत्या. बहुतांश गुरुजींनी उस्मानाबाद, तुळजापूर आणि त्यानंतर कळंबला पसंती दिली होती. त्यामुळे असमतोल निर्माण होवून शाळा बंद पडण्याचा धोका निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेवून मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी प्रधान सचिवांकडे उपरोक्त प्रक्रियेसाठी ५ जूनपर्यंत मुदत वाढवून मागिती होती. त्यानुसार प्रधान सचिवांनीही हिरवा कंदिल दिला होता.
दरम्यान, जून महिना सुरू होवूनही आपसी तसेच तालुकास्तरीय विंनती आणि प्रशासकीय बदल्या होत नसल्याने पात्र गुरुजींमध्ये धाकधूक वाढली होती. मागील दोन दिवसांपासून जिल्हा परिषदेत गुरुजींचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता.जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण सभापती, शिक्षणाधिकारी यांची भेट घेवून प्रक्रिया राबविण्याबाबत आग्रह धरला जात होता. त्यानुसार अध्यक्ष अॅड. धीरज पाटील यांनी जिल्हास्तरीय आपसी बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करून घेण्याबाबत सूचना केली होती. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी मंगळवारी शिक्षण विभागाला ही प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार शिक्षण विभागाने बदल्यांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. जिल्हास्तरीय आपसी बदल्या २ जून रोजी तर तालुकास्तरीय विनंती आणि प्रशासकीय बदल्या ४ जून रोजी घेण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
७४ गुरुजींनी दाखल केले प्रस्ताव
जिल्हास्तरीय विनंती बदलीसाठी तब्बल सातशेवर प्रस्ताव आले होते. परंतु, अतिरिक्त गुरूजी आणि निमशिक्षकांमुळे या बदल्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे २ जून रोजी जिल्हास्तरावर केवळ आपसी बदल्या होणार आहेत. या बदल्यांसाठी जवळपास ७४ गुरूजींनी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. शिक्षण विभागाने बदल्यांच्या तारखा जाहीर केल्यामुळे उपरोक्त पात्र गुरूजींचा जीव भांड्यात पडला आहे.
‘झेडपी’ : पात्र असणाऱ्या गुरुजींमध्ये समाधानाचे वातावरण
जिल्हास्तरीय आपसी बदल्यांसाठी ७४ च्या आसपास शिक्षकांचे प्रस्ताव आले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय प्रशासकीय आणि विनंती बदल्यांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. सदरील बदली प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत, असे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.