गुरुजींची शाळा; टक्का देऊन गुपचूप मिळविला जातो अत्युत्कृष्ट ‘सीआर’
By विजय सरवदे | Published: May 22, 2023 12:27 PM2023-05-22T12:27:44+5:302023-05-22T12:28:23+5:30
निवडश्रेणीसाठी संघटनांमध्ये प्रबळ असलेले शिक्षकांचा खटाटोप : विभागाकडे साडेनऊशे शिक्षकांचे प्रस्ताव
छत्रपती संभाजीनगर : निवडश्रेणी मिळाली की, शिक्षकाला थेट एक वेतनवाढीचा फायदा होतो. सध्या निवडश्रेणीची प्रक्रिया अंतिम करण्याच्या हालचाली सुरू असून, अतित्कृष्ट गोपनीय अहवाल लिहून घेण्यासाठी अनेक शिक्षक मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांच्या शोधार्थ फिरत आहेत. विशेष म्हणजे, ‘सीआर’ लिहून घेण्याच्या या व्यवहारात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याच्या तक्रारी ऐकूनही शिक्षक संघटनांनी मात्र, ‘तेरी भी चूप अन् मेरी भी चूप’ असा पवित्रा घेतला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी ३१ मेपूर्वी शिक्षकांचे बहुतांशी प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शिक्षण विभागाही सध्या ‘ॲक्टिव्ह मोड’वर आहे. दरम्यान, २४ वर्षांची सलग सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना निवडश्रेणी दिली जाणार आहे. यासाठी शिक्षण विभागाकडे साधारणपणे ९५० शिक्षकांचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. ज्या वर्षी शिक्षकांची सेवा २४ वर्षे पूर्ण झालेली आहे, त्यापूर्वीच्या दोन वर्षांचे अतित्कृष्ट गोपनीय अहवाल निवडश्रेणीसाठी अनिवार्य आहेत. याशिवाय संबंधित शिक्षकांवर कोणतीही कारवाई झालेली नसावी, त्याची विभागीय चौकशी झालेली अथवा सुरू नसावी, हे निकष आहेत.
दुसरीकडे शिक्षकांना दरवर्षी गोपनीय अहवाल दिले जातात. मात्र, मागील दोन वर्षांपासून औरंगपुरा येथील जि.प.च्या प्रशासकीय इमारतीचे काम सुरू असल्यामुळे स्टेशन रोडलगत चेलीपुरा हायस्कूलच्या इमारतीमध्ये शिक्षण विभाग स्थलांतरित झाला आहे. त्यामुळे अनेकांचे गोपनीय अहवाल गहाळ झाले आहेत. परिणामी, शिक्षकांना आता नव्याने गोपनीय अहवाल हस्तगत करावे लागत आहेत.
पैसे द्या अन् सीआर घ्या!
संघटनांमध्ये प्रबळ असलेले शिक्षक हे स्वत:च अति उत्कृष्ट असा शेरा लिहून गोपनीय अहवाल तयार करतात व मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांच्या हातावर ‘दाम’ ठेवून अहवालावर फक्त स्वाक्षऱ्या घेत आहेत. मात्र, ज्यांनी अध्यापनाबरोबरच राष्ट्रीय कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रामाणिकपणे परिश्रम घेतलेले आहेत, ते शिक्षक निवडश्रेणी शर्यतीतून बाजूला फेकले जात आहेत. काही जणांनी शिक्षक संघटनांकडे यासंबंधीची तक्रार केली, पण ‘तेही आपलेच आणि तुम्हीही आपलेच, या भूमिकेतून पदाधिकारी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत आहेत.