।। गुरुविण मज कोण दाखविल वाट़़़।।

By Admin | Published: July 11, 2014 11:41 PM2014-07-11T23:41:38+5:302014-07-12T01:13:27+5:30

बीड : कुठल्याही यशस्वी व्यक्तीच्या कर्तृत्वाचे पैलू तपासताना एका प्रश्न हमखास विचारला जातो तो म्हणजे तुमचे गुरु कोण? ‘गुरुविण कोण दाखविल वाट.. आयुष्याचा पथ का दुर्गम..

.. Guruvinan ki anojin waht ki .. | ।। गुरुविण मज कोण दाखविल वाट़़़।।

।। गुरुविण मज कोण दाखविल वाट़़़।।

googlenewsNext

बीड : कुठल्याही यशस्वी व्यक्तीच्या कर्तृत्वाचे पैलू तपासताना एका प्रश्न हमखास विचारला जातो तो म्हणजे तुमचे गुरु कोण? ‘गुरुविण कोण दाखविल वाट.. आयुष्याचा पथ का दुर्गम.. अवघड डोंगरघाट...’ या गुरुवचनाप्रमाणे आयुष्यात गुरुंचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
किंग होण्यापेक्षा किंंगमेकर होणे कधीही उत्तम असे म्हटले जाते. विविध क्षेत्रात यशोशिखर गाठणाऱ्या अशाच शिष्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरुंप्रती व्यक्त केलेली ही कृतज्ञता त्यांच्याच शब्दात....
बीड : माणसाच्या आयुष्याला गुरुशिवाय कलाटणी मिळत नाही हे खरेच आहे़ गुरु आणि शिष्याच्या अनेक वर्षांच्या परंपरेतून हेच सिध्द झाले आहे़ माझ्या आयुष्यातही आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या बालरोग तज्ञ डॉ़ आरती किनीकर या गुरुरुपाने आल्या आणि अवघड वाटणारा प्रवास मी सहज पूर्ण केला़
येथील बालरोग तज्ज्ञ डॉ़ संजय जानवळे यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या कृतज्ञ भावना 'लोकमत'कडे व्यक्त केल्या़ ते म्हणाले, पुणे येथे पदव्युत्तर शिक्षण घेताना विभाग प्रमुख म्हणून डॉ़ आरती किनीकर लाभल्या़ त्यांची कडक शिस्त पाहून मी धास्तावलो होतो़ परंतु धाडस करुन त्यांच्या दालनात गेलो़ मॅडम मला अभ्यासक्रम झेपेल का ? असे विचारले तेव्हा त्यांनी सीट डाऊन असे म्हणत माझ्या राहण्याची, खाण्याची आस्थेवाईकपणे चौकशी केली़ काळजी करु नको, सारे व्यवस्थित होईल, असे सांगत त्यांनी धीर दिला़ इंग्लंड येथे उच्च शिक्षण घेऊन भारतात आलेल्या डॉ़ किनीकर यांनी आम्हाला केवळ बालरोग या विषयाचे ज्ञानच दिले नाही तर वैद्यकीय क्षेत्राकडे सेवाभाव म्हणून पाहण्याची दृष्टी दिली़ अत्यंत अवघड विषय साध्या आणि सोप्या भाषेत समजावून सांगण्यात त्यांचा हातखंडा आहे़ बालरोगाचे बेसिक्स, रुग्णांप्रती कर्तव्य भावना, सामाजिक बांधिलकी त्यांच्याकडून शिकायला मिळाली़
तीन वर्षांचा अभ्यासक्रम संपवून निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा डोळ्यातून अश्रू ओघळण्यास सुरुवात झाली़ त्यांची कडक शिस्त आणि दरारा यामुळेच मी घडू शकलो याची जाणिव निरोपादरम्यान झाली़ त्यांनी घालून दिलेल्या तत्वांशी प्रामाणिक राहण्याचा माझा प्रयत्न असतो़ त्या गुरु रुपाने आयुष्यात आल्या नसत्या तर काय झाले असते याचा विचारही अस्वस्थ करतो़ त्यांच्यासारखे गुरु इतरांनाही मिळावेत हीच अपेक्षा़
गुरु वचनाचे आचरण केल्याने यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलो
बीड : गुरु हा प्रत्येकाला जीवन जगण्याचा मार्ग देतो, जीवनाला आकार देतो. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु असणे गरजेचे आहे. गुरुच्या सानिध्यात राहुन यश तर मिळतेच शिवाय सुसंस्कारही घडतात. माझे गुरु अ‍ॅड. भाऊसाहेब जगताप यांच्यामुळे घडलो, वाढलो व यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलो ते केवळ त्यांच्या मुळेच. अशी प्रतिक्रीया व्यक्त केली जिल्हा सहाय्यक सरकारी वकील नामदेव साबळे यांनी.
अहमदनगर जिल्ह्यातील न्यु लॉ कॉलेजमध्ये एलएलबीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर करीअरसाठी बीड शहरात आहे. त्यावेळी तत्कालीन जिल्हा सरकारी वकील भाऊसाहेब जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली. अ‍ॅड. जगताप यांची सर्वांशी वागण्याची पद्धत निराळी होती. ते अनेकांमध्ये पटकन मिसळुन जात, त्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यांच्या हाताखाली काम करताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. दाखल झालेल्या केसेस कशा हाताळायच्या, कोर्टात सादर कशा करायच्या आदी बाबींची बारीक-सारिक माहिती त्यांनी दिली. त्याचा लाभ वकील व्यवसायात मोठ्या प्रमाणात झाला. अ‍ॅड. जगताप यांचा अभ्यास दांडगा होता.
रात्री उशीरापर्यंत जागुन ते नियमीत वाचन करायचे. आपले वरीष्ठ रात्र जागुन अभ्यास करतात, त्यामुळे आम्ही त्यांच्या पायावर पाय टाकत रात्री अभ्यास करु लागलो. वकील व्यावसायातील त्यांनी अनेक गोष्टी शिकविल्यामुळे कोर्टात प्रकरणे हाताळताना अडचणी आल्या नाहीत. अ‍ॅड. जगताप आचरण मी आंगिकारले, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकरणातील केसेचा निपटारा अत्यंत सक्षमपणे करु शकलो.
२००४ साली मी सहायक सरकारी वकील म्हणून कार्यरत झालो. माझ्या वकिलीच्या सरकारी पक्षाच्यावतीने सक्षमपणे बाजु मांडल्याने आतापर्यंत जवळपास तीस प्रकरणात आरोपिंना शिक्षा झाली. दहा ते बारा प्रकरणात आरोपिंना जन्मठेपेची शिक्षा झाली. मला जे काही यश मिळाले आहे ते केवळ माझे गुरु अ‍ॅड. भाऊसाहेब जगताप यांच्या मुळे . त्यांच्यामुळे बीड येथील लॉ कॉलेज येथे विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान देण्यास संधी मिळाली. गेल्या पंधरा वर्षापासून लॉ कॉलेजमध्ये शिकवत आहे. ही संधी ही मला त्यांच्यामुळेच मिळाली असल्याचे जिल्हा सहाय्यक सरकारी वकील नामदेव साबळे यांनी व्यक्त केले.
गुरुमुळे माझे आयुष्य घडले़ त्यामुळे सर्वांनी आपल्या जीवनात एक गुरु मानला पाहिजे़ त्यांच्या सांगण्यानुसार आपण कार्य केले तर आपला विकास निश्चित आहे़ शिवाय त्यांच्याकडून बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळतात़ जे ज्ञान आपल्याला इतर कोठेही मिळणार नाही किंवा शिकविणार नाही ते फक्त गुरू नि:संकोचपणे व नि:स्वार्थपणे शिकवितात़ त्यांचा हात आपल्या पाठीवर नेहमीच असतो़
तायक्वांदोत पैलू पाडणारे गुरु
बीड : जागतिक पातळीवर तायक्वांदोत बीड जिल्ह्यातील खेळाडू चमकवून त्यांच्याकडून मेहनत घेणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रशिक्षक अविनाश बारगजे हे नाव आता सर्वांच्या परिचयाचे झाले आहे़
बीड जिल्ह्यातील पूस या छोट्या खेड्यात जन्मलेल्या मला तायक्वांदोच्या निमित्ताने त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन पोहचविले़ बारगजे सरांनी माझ्यातील गुणवत्ता ओळखून मला पैलू पाडण्याचे काम केले़ त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील पाच सुवर्णपदके, राज्य पातळीवरील नऊ सुवर्णपदके हे बहुमान मी मिळवू शकलो़ त्याचे श्रेय बारगजे सरांना जाते़ बीडच्या जिल्हा स्टेडियममध्ये हा सराव करीत असताना प्रारंभीच्या काळात आपण राष्ट्रीय पातळीवर पोहचू असे मला वाटले नव्हते़ परंतु बारगजे सरांनी माझ्यासाठी आणि माझ्यारख्याच इतर विद्यार्थ्यांसाठी कष्ट घेतले़
मराठीचा अनभिषिक्त सम्राट
बीड : पद्मश्री आणि पीएच़डी़, डी़ लिट़ अशा त्रिगुणात्मक पदवी असलेले मार्गदर्शक आणि महाराष्ट्रातील संत साहित्याचे सारस्वत डॉ़ यु़ म़ पठाण हे माझे मार्गदर्शक गुरु आहेत़ याचा सार्थ अभिमान मला आहे़ 'संत जनी जनार्दन' या विषयावर संशोधन करणार आहे हे सांगितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील तेजस्वी भाव आजही मला हृदयात शिलालेखासारखे भासतात़ सरांचे मूळ गाव सोलापूऱ त्यांनी कधीही मला मंगळवेढ्याहून औरंगाबादला बोलावले नाही़ त्यांचे मोठेपणाचे दर्शन घडणारे अनेक प्रसंग आहेत़ चेकोस्लोव्हाकियाला ते गेल्यानंतर आमच्या मार्गदर्शनात काहीसा खंड पडला होता़ परंतु वापस आल्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली हा मनाचा मोठेपणा फार कमी लोकांमध्ये असतो़ त्यांच्या कामाचा स्वत:चा मोठा आवाका असतानाही त्यांनी परदेशस्थ मराठी प्रेमिकांनाही मार्गदर्शन केले़ अ‍ॅनाफिल्ड हाऊस ही एक अशीच परदेशी विद्यार्थिनी़ तिला लीळाचरित्राबद्दल मार्गदर्शन करताना दौलताबाद हा उच्चार त्या विदेशी मुलीला जमत नव्हता़ परंतु सरांनी मोठ्या कष्टांनी तिचे मराठी उच्चार करुन घेतले़ सर सकाळी ४़३० वाजता उठत़ विद्यापीठातील अनेक हस्तलिखित त्यांच्यामुळे समृध्द झाले आहेत़ आपल्यासोबतच आपले विद्यार्थी या क्षेत्रात नावलौकिक व्हावेत हे मोठेपण त्यांना जमले़ डॉ़ कै़ सुधाकर चांदजकर, डॉ़ शरद व्यवहारे, डॉ़ कुमुद गोसावी, डॉ़ रमेश अवलगावकर, डॉ़ अविनाश अवलगावकर, डॉ़ राम तोंडारे, डॉ़ लक्ष्मण देशपांडे, डॉ़ नागनाथ कोत्तापल्ले अशी कितीतरी मंडळी डॉ़ यु़ म़ पठाण यांच्या गुरुकुलात पीएच़ डी़ झाली़
सुरेल गळ्याचे धनी पं़ जसराज
बीड : माहिती आणि तंत्रज्ञानाची साधने सद्य परिस्थिती विपुल असतानाही स्वराच्या दुनियेत मार्गदर्शक हा आवश्यक आहेच़ सध्याचा काळ ४५ ते ५० मिनिटांनी महाविद्यालयात बदलणारा अध्यापक हा आहे़ पण त्याही पलिकडे जाऊन संस्कृत, संगीत, मल्लविद्या आदी क्षेत्रात संथा देणे, रियाज करुन घेणे, पेच किंवा विशेष क्रिया करुन घेणे यासाठी गुरुच आवश्यक असतो़ त्यामुळे गुरुकूल आणि त्या क्षेत्रातील गुरु शिष्याचे नाते गंडाबंधन हे आजही पवित्र मानले जाते़ भारतरत्न सचिन तेंडुलकर हा आपल्या गुरुचे रमाकांत आचरेकरांचे नाव आजही आवर्जून घेतो़ त्याचप्रमाणे संगीत क्षेत्रात गुरुवर्य पद्मविभूषण पं़ जसराज यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते़ त्यांचा शिष्य होण्याचे भाग्य मला लाभले हा माझ्या जीवनातील उत्कट क्षण आहे, असे पंडित शिवदास देगलूरकर यांनी सांगितले़ गुरुवर्य पं़ नाथराव नेरलकर, सूरमणी शामराव गुंजकर आणि संगीतमणी अण्णासाहेब गुंजकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतलेल्या मी खऱ्या अर्थाने पं़ जसराज यांच्या शिष्य परंपरेत पात्र होऊ शकलो़ त्याचे महत्वाचे कारणे म्हणजे तालमार्तंड कै़ रंगनाथबुवा देगलूरकर हे माझे वडिल होते़ कलकत्याच्या इंडियन टोबॅको कंपनीच्या संगीत रिसर्च अकादमीची छात्र शिष्यवृत्ती मिळाली ती ही माझा गुरुमुळेच़ भोपाळ येथे रविंद्र भवनात पंडितजींच्या शिष्यांचा तीन दिवस समारोह झाला होता़ त्यावेळी प्रतिभावंत गायक म्हणून माझा उल्लेख केला गेला़ तो दिवस दिन दोगुनी रात चौगुनी असा होता़

Web Title: .. Guruvinan ki anojin waht ki ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.