दीड वर्षात ६१ कोटींचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:12 AM2018-05-19T00:12:05+5:302018-05-19T00:14:12+5:30
बंदी असूनही चोरी-छुपे गुटखा विकल्या जात आहे. मागील दीड वर्षात मराठवाड्यातील १२२६ दुकानांतून ६१ कोटी रुपयांचा गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू जप्त करण्यात अन्न व औषध विभागाला यश आले आहे. यातील ८३७ जणांविरोधात खटले दाखल करण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बंदी असूनही चोरी-छुपे गुटखा विकल्या जात आहे. मागील दीड वर्षात मराठवाड्यातील १२२६ दुकानांतून ६१ कोटी रुपयांचा गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू जप्त करण्यात अन्न व औषध विभागाला यश आले आहे. यातील ८३७ जणांविरोधात खटले दाखल करण्यात आले आहेत.
गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, स्वादिष्ट सुपारी यांचे उत्पादन, साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर राज्य शासनाने जुलै २०१२ मध्ये बंदी घातली आहे. कारण गुटख्याच्या सेवनाने तोंडाचा कर्करोग होत असून, त्यात अनेकांचे जीव गेले आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रात जरी गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखूवर बंदी असली तरी परप्रांतात नाही. त्यामुळे चोरी-छुपे गुटखा परप्रांतातून आणला जात आहे. अवैधरीत्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाºयांवर कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाला आहेत.
जानेवारी २०१७ ते मे २०१८ या कालावधीत या विभागाने मराठवाड्यातील १६ हजार १९३ पानटपºया, दुकान, गोदामांची तपासणी केली. त्यातील १२२६ दुकानांतून ६१ कोटी १५ लाख ४४ हजार १३१ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी जप्त केली. त्यातील ६६९ विक्रेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. ८३७ जणांविरोधात खटले दाखल करण्यात आले. कारवाई सुरूच आहे.
जिल्ह्यात ५० लाखांचा गुटखा
अन्न व औषध प्रशासनाने मागील दीड वर्षात जिल्ह्यातील ४० पानटपºया, दुकाने व गोदामांवर छापे टाकून ५० लाखांचा गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले.
बॉयलरमध्ये जाळणार गुटखा
३ वर्षे ५ महिन्यांत ४३ ठिकाणांहून जप्त केलेला ९२ लाखांचा गुटखा १७ डिसेंबर २०१६ रोजी एका आॅईल मिलच्या बॉयलरमध्ये जाळण्यात आला होता. सुमारे १० टन गुटखा जाळण्यासाठी १२ तास लागले होते. त्यानंतर मागील दीड वर्षात जिल्ह्यात जप्त केलेला ५० लाखांचा गुटखा येत्या महिनाभरात जाळण्यात येणार आहे. गुटखा उघड्यावर जाळता येत नाही. रोडरोलरखाली ठेवला तरीही तो नष्ट होत नाही. बॉयलरमध्ये गुटखा जळून खाक होतो. बॉयलर असलेल्या कंपनीचा होकार मिळताच आम्ही गुटखा जाळून टाकू.
-चं.भा. पवार, सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन