प्रत्येक रस्त्यावर मिळतोय गुटखा; अनधिकृतपणे सुरु पानटपऱ्याने चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 07:15 PM2020-08-29T19:15:34+5:302020-08-29T19:22:48+5:30

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Gutkha availability on every street; Anxiety was heightened by the unofficially started Pan shops | प्रत्येक रस्त्यावर मिळतोय गुटखा; अनधिकृतपणे सुरु पानटपऱ्याने चिंता वाढली

प्रत्येक रस्त्यावर मिळतोय गुटखा; अनधिकृतपणे सुरु पानटपऱ्याने चिंता वाढली

googlenewsNext
ठळक मुद्देप्रत्येक रस्त्यावरील पानटपरीवर मिळतोय गुटखाशहरात सर्व ठिकाणी अनधिकृतपणे पानटपऱ्या सुरू

- बापू सोळुंके

औरंगाबाद : कोरोनाबाधित व्यक्तीच्या थुंकीवाटे कोरोना पसरतो. परिणामी, शहरातील पानटपऱ्या उघडण्यास अद्याप परवानगी देण्यात आली नाही. असे असताना गेल्या काही दिवसांपासून शहरात अनधिकृतपणे सुरू झालेल्या प्रत्येक पानटपरीवर सर्रासपणे गुटखा विक्री केला जात असल्याचे ‘लोकमत’ने शुक्रवारी केलेल्या ‘रिअ‍ॅलिटी चेक’मध्ये  दिसून आले.

औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा २२ हजारांच्या पार गेला आहे.  शहरातील विविध रुग्णालयांत ४ हजार ५३४ कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनामुळे आजपर्यंत ६६८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी डॉक्टरांसह प्रशासकीय यंत्रणा रात्रं-दिवस जीव धोक्यात घालून काम करीत आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या थुंकी अथवा नाका-तोंडावाटे बाहेर पडणारा सूक्ष्म द्रव दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात गेल्यास कोरोनाची लागण होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पानटपऱ्या उघडण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. असे असले तरी पानटपरी व्यावसायिकांनी अनधिकृतपणे टपऱ्या सुरू केल्या आहेत. महापालिकेसह पोलिसांनी पानटपरीचालकांकडे दुर्लक्ष केले आहे. याचाच गैरफायदा घेत पानटपरी व्यावसायिकांनी विविध कंपन्यांच्या बंदी असलेल्या गुटख्याची खुलेआम विक्री सुरू केल्याचे ‘लोकमत’ने शुक्रवारी केलेल्या ‘रिअ‍ॅलिटी चेक’मध्ये दिसून आले. शहरातील सर्वच कॉलनी आणि रस्त्यावरील पानटपरीमध्ये गुटखा सहज उपलब्ध होत असल्याचे दिसून आले. मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन येथील दारू दुकानाशेजारील टपरीचालकाकडे गुटख्याची मागणी केली असता त्याने सहज पिशवीत हात घालून २० रुपयांमध्ये गोवा कंपनीच्या सहा पुड्या दिल्या, तर विश्रांतीनगर येथील छत्रपती पानटपरीवर बिनधास्त गुटखा विक्री केला जात असल्याचे दिसले.  

टपरीत ठेवलेल्या विविध कंपन्यांच्या गुटख्याच्या पुड्याचे पाकीट ठेवलेले दिसले. टपरीचालकाने ३० रुपयांत आरएमडीच्या चार पुड्या ‘लोकमत’ प्रतिनिधीला विक्री केल्या. कामगार चौकातील सर्वच पानटपऱ्यांवर गुटखा उपलब्ध असल्याचे दिसले. शेअरईट नावाच्या टपरीत बसलेला १४ वर्षांचा मुलगा गुटखा विक्री करीत होता. सिडकोच्या वसंतराव नाईक पुतळ्यामागील टपरीचालकाने  १० रुपयांना गुटख्याची पुडी विक्री केली. कॅनॉट प्लेसमध्येही विविध पान स्टॉल्सवर गुटखा विक्री सुरू असल्याचे नजरेस पडले. उद्यानाच्या दक्षिण गेटजवळील  पानटपरीचालक तरुणाने  बिनधास्तपणे ग्राहकांना गुटखा विक्री केल्याचे दिसले. लोकमत प्रतिनिधीने गुटखा हैं क्या असे विचारताच त्याने ५० रुपयांच्या सहा पुड्या असा दर सांगून  दहा रुपयांना एक पुडी दिली. कटकटगेट येथील सना पान टपरीचालकानेही दहा रुपयांना गुटख्याची एक पुडी दिली. सर्व प्रकारचा गुटखा असल्याचे त्याने सांगितले. राजाबाजार येथील श्याम पान स्टॉल येथेही लोकमत प्रतिनिधीला मागणी करताच गुटखा उपलब्ध करून देण्यात आला.


गुटख्यातून कोट्यवधींची उलाढाल 
राज्यात  गुटखा बंदी झाल्यापासून छुप्या मार्गाने गुटखा आणून विक्री केला जातो. गुटख्याला ग्राहकांची मागणी अधिक असल्याने टपरीचालकापर्यंत गुटखा पोहोचवला जातो. टपरीचालक तीन ते चारपट दराने गुटखा विक्री करून कोट्यवधींची कमाई करतात. शहरात गुटखा कुठून येतो, गुटखा पुरवणारा डीलर कोण आहे आणि गुटखा छोट्या मोठ्या दुकानदारापर्यंत कसा पोहोचवला जातो. याविषयी इत्यंभूत माहिती पोलिसांना असते. मात्र, गुटखा माफियांसोबत असलेल्या ‘‘अर्थपूर्ण’’ संबंधामुळे गुटखा विक्रीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अन्न व औषधी प्रशासनाला कारवाईचे अधिकार 
गुटखा विक्रेत्यांवर कारवाईचे अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार आहेत. मात्र, या विभागाकडून भरीव अशी कारवाई आतापर्यंत झालेली दिसत नाही. पोलीस अधिकारी, कर्मचारी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना सोबत घेऊन कारवाई करतात. अन्न सुरक्षा अधिकारी याची फिर्याद घेऊन गुन्हा नोंदवितात. 

गुटखा पकडण्याचा आता पोलिसांनाही अधिकार
राज्यात गुटखाबंदी आहे; तरीपण कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून गुटखा विक्रीसाठी येत असल्याचे मागील वर्षभरात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईवरून उजेडात आले आहे. जिल्ह्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे ५ अन्न निरीक्षक आहेत. कारवाईसाठी मनुष्यबळ कमी पडत आहे. यामुळे शासनाने गुटख्याविरोधात कारवाई करण्यासाठी पोलीस विभागाला अधिकार दिले आहेत. अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभाग गुटख्याविरोधात कारवाई करीत आहेत. 
-मि.द. शाह, सहायक आयुक्त (अन्न)

Web Title: Gutkha availability on every street; Anxiety was heightened by the unofficially started Pan shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.