औरंगाबादमध्ये घरात लावलेल्या गुटखा पॅकिंगच्या कारखान्याचा पर्दाफाश, 21 लाख रुपयांचा गुटखा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2017 03:00 PM2017-09-01T15:00:36+5:302017-09-01T15:40:24+5:30
औरंगाबादमधील मुकुंदवाडी परिसरातील विनायक कॉलनी आणि चिकलठाणा येथील हिनानगर येथे घरात सुरू असलेल्या गुटख्याच्या कारखान्यावर अन्न व औषधी प्रशासन विभागाने शुक्रवारी ( 1 सप्टेंबर ) एकाचवेळी धाडी मारल्या. या कारवाईत दोन्ही कारखान्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
औरंगाबाद, दि. 1 - मुकुंदवाडी परिसरातील विनायक कॉलनी आणि चिकलठाणा येथील हिनानगर येथे घरात सुरू असलेल्या गुटख्याच्या कारखान्यावर अन्न व औषधी प्रशासन विभागाने शुक्रवारी ( 1 सप्टेंबर ) एकाचवेळी धाडी मारल्या. या कारवाईत दोन्ही कारखान्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान सुमारे 21 लाख रुपयांचा गुटखा आणि यंत्र जप्त करण्यात आली आहेत. शहरात अशाप्रकारे सुरू असलेल्या गुटख्यांच्या कारखान्याचा प्रथमच पर्दाफाश झाला. विशेष म्हणजे या कारवाईपासून पोलिसांना दूर ठेवण्यात आले.
याविषयी अधिक माहिती देताना अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहआयुक्त चंद्रकांत पवार म्हणाले की, राज्यात गुटखा बंदी आहे. असे असताना शहरात खुलेआम गुटखा विक्री होत असल्याच्या बातम्या सतत येत असतात. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केली जाते. शहराबाहेरून गुटखा येऊ नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहे. असे असताना शहरात दोन ठिकाणी गुटख्याचे कारखाने सुरू असल्याची माहिती आम्हाला प्राप्त झाली. या माहितीची खात्री करण्यात आली. यानंतर या कारखान्यांवर कारवाई करण्यासाठी आम्ही तीन पथके तयार केली. विशेष म्हणजे या कारवाईसाठी नांदेड, बीड आणि उस्मानाबाद येथील अधिका-यांना बोलावून घेतले. तीन पथकांनी एकाचवेळी विनायक कॉलनी आणि चिकलठाणा येथील हिनानगर येथील कारखान्यावर धाडी मारल्या.
विनायक नगर येथील एका घरात सुरू असलेल्या या कारखान्यावर सहआयुक्त पवार, सहायक आयुक्त अभिमन्यू केसरे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर, दयानंद पाटील, उमेश कावळे, नमूना सहायक पांडुरंग नाडे आणि प्रमोद शुक्ला यांनी कारवाई केली. घरमालक हनुमंत श्रीपत मुंढे (रा.विनायक कॉलनी) आणि मोहसीन सय्यद(रा.ब्रहाणपुर, मध्यप्रदेश) यांनी हा कारखाना सुरू केल्याचे समजले. या कारखान्यात आर.एम.डी. माणिकचंद, गोवा, हिरा, अशा वेगवेगळ्या लेबल असलेल्या पॅकेज गुटख्याचा मोठा साठा आढळला. शिवाय गुटखा पॅकिंग करण्याची मशीन, कच्चा माल आढळून आला. मात्र, घरमालक मुंढे हा घरी आढळला नाही. यावेळी मोहसीन सय्यदच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.
हिनानगर येथे ही छापा
हिनानगर येथील कारखान्यावर सहआयुक्त रामेश जाधव, राम मुंढे, संतोष कंकवाड,संजय चट्टे, निखील कुलकर्णी, फरीद सिद्दीकी आणि अशोक पारधी यांच्या पथकाने कारवाई केली. तेथेही सुमारे दहा लाख रुपयांचा गुटखा आणि पॅकेजिंग मशिन, कच्चा माल मिळाल्याचे सहआयुक्त पवार यांनी सांगितले.