भोकरदनमध्ये सतरा लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 01:14 AM2017-10-28T01:14:12+5:302017-10-28T01:14:48+5:30
शहरात साठा केलेल्या अवैध गुटखा गोदामावर अन्न व औषधी प्रशासन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून १७ लाख ३ हजार ९५० रूपयांचा गुटखा व पानमसाला जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : शहरात साठा केलेल्या अवैध गुटखा गोदामावर अन्न व औषधी प्रशासन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून १७ लाख ३ हजार ९५० रूपयांचा गुटखा व पानमसाला जप्त केला. शहरातील अत्तार गल्ली भागात गुरुवारी मध्यरात्रीनंतर ही कारवाई करण्यात आली.
शहरातील मकरज मशीद परिसरातील न्यू हायस्कूल रस्त्यालगतच्या भागात अवैध गुटखा साठवून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी याबाबत अन्न प्रशासनाच्या औरंगाबाद विभागाचे सहआयुक्त सी़ बी़ पवार यांना माहिती दिली.
गुरुवारी मध्यरात्रीनंतर शहरातील पोलीस व अन्न प्रशासनाच्या अधिका-यांनी मरकज मज्जीद न्यू हायस्कुल रोड येथील मोहमद कमर मोहमद कादर यांच्या मालकीच्या घराची झडती घेतली असता, हिरा, विमल , आरएमडी पानमसाल्याचे २ लाख ४४ हजार २५० रूपये किमतीचे १० पोते आढळून आले.
या प्रकरणी अन्न प्रशासनाने संशयित मुजाहेद रफिक शेख (२५, रा. अत्तारगल्ली) यास ताब्यात घेतले. याच परिसरातील युनूस मास्टर यांच्या घराची झडतीत हिरा, रॉयल टोबॅकोच्या १४ लाख ९९ हजार ७००, असा एकूण १७ लाख ३ हजार ९५० रूपयांचा गुटखा ताब्यात जप्त केला.
गुरुवारी मध्यरात्री सुरू झालेली ही कारवाई शुक्रवारी पहाटेपर्यंत सुरू होती.
या प्रकरणी संशयित मुजाहेद रफिक शेख, शाकेर ताहेर खान या दोघांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी संजय चटटे, प्रज्ञा सुरसे, प्रल्हाद क्षीरसागर, डॉ. राम मुंढे, पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी, गुन्हे शाखेचे गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, सम्युअल कांबळे, सचिन चौधरी, सदाशिव राठोड, विलास चेके यांनी ही कारवाई केली.