औरंगाबादेत गुन्हेशाखेने जप्त केला साडेतीन लाखाचा गुटखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 06:52 PM2019-06-19T18:52:45+5:302019-06-19T18:55:30+5:30
गुन्हेशाखा आणि सिटीचौक पोलिसांनी अवैध गुटखा विक्रेत्यांवर धाडसत्र सुरू केले आहे
औरंगाबाद: गुटखा आणि घातक रसायन मिश्रीत सुंगधी तंबाखू विक्री करण्यास राज्य सरकारने बंदी घातलेली असतांना शहरात चोरट्या मार्गाने सहज गुटखा मिळतो. ही बाब गांभीर्याने घेत गुन्हेशाखा आणि सिटीचौक पोलिसांनी अवैध गुटखा विक्रेत्यांवर धाडसत्र सुरू केले. आठ दिवसात सलग तिसरी कारवाई करीत, गुन्हेशाखेने सातारा परिसरातील अलोकनगरातील एका घरात लपविला ३ लाख ५६ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. हा साठा करणाऱ्या एका जणाला पोलिसांनी अटक केली.
शिवहर गोपाळराव माळशिखरे (वय ३८,रा. गणेशनगर, पुंडलिकनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे. गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे म्हणाले की, गुन्हेशाखेचे पथक गस्तीवर असताना अलोकनगरात बांधकाम सुरू असलेल्या एका घरात गुटख्याचा साठा एकाने आणून ठेवला असून तेथून या गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती खबऱ्याने त्यांना दिली. निरीक्षक मधूकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देशमुख आणि पथकाने ,अन्न सुरक्षा अधिकारी यांना सोबत घेऊन १९ मे रोजी सकाळी संशयित घरावर धाड टाकली.
तेथे आरोपी शिवहर गोपाळराव माळशिखरे बसलेला होता. त्या घरात सुमारे २ लाख ३७ हजार रुपये किंमतीच्या हिरा पान मसाल्याच्या १५ गोण्या आणि १ लाख २८ हजार रुपये किंमतीच्या रॉयल ७१७ ही सुगंधी तंबाखूच्या नऊ गोण्या असा सुमारे ३ लाख ५६ हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा मिळाला. आरोपीविरूद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई उपनिरीक्षक अमोल देशमुख, सहायक उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे, पोलीस कर्मचारी सुधाकर मिसाळ, अफसर शहा, विकास माताडे, लालखॉ पठाण, बापूराव बावस्कर, धर्मराज गायकवाड, संजय राजपूत, योगेश गुप्ता, नंदू चव्हाण आणि शिवाजी शिंदे यांनी केली.