वडोदबाजार फाट्यावर पोलिसांच्या कारवाईत ११ लाखांचा गुटखा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 12:07 PM2024-08-20T12:07:13+5:302024-08-20T12:07:51+5:30
जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वडोदबाजार फाटा
फुलंब्री : तालुक्यातील जळगाव महामार्गावर वडोदबाजार फाटा येथे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ११ लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा पकडला. ही कारवाई सोमवारी रात्री साडेदहा वाजता करण्यात आली.
जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर एका टेम्पोमध्ये ( एमएच २० जी सी २४१३) महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. यामाहितीवरून वडोदबाजार फाटा कमानीजवळ पोलिसांनी नाकाबंदी केली. रात्री साडेदहा वाजता पोलिसांनी संशयित टेम्पो अडविला. टेम्पो शेख पप्पू शेख दगडू ( ४७, राहणार भोकरदन रोड सिल्लोड ) हा चालवत होता. तपासणी केली असता टेम्पोमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला ११ लाख ३२ हजार रुपयांचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटखा आणि टेम्पो असा एकूण १६ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाला माहिती देण्यात आली असून त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विनय राठोड यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षण सतीश वाघ, जमादार शेख कासम, सुनील खरात, गोपाल पाटील, विठ्ठल डोके,आनंद घाटेश्वर ,राहुल गायकवाड यांच्या पथकाने केली.