गुटख्याची विक्री तेजीत!

By Admin | Published: June 2, 2014 12:24 AM2014-06-02T00:24:15+5:302014-06-02T00:52:58+5:30

जालना: राज्यात सर्वत्र गुुटखाविक्रीला बंदी असताना शहरासह जिल्ह्यात मात्र गुटखा विक्री तेजीत असून, विक्रेत्यांची चांगलीच चांदी होताना दिसत आहे़

Gutkha's fastest selling! | गुटख्याची विक्री तेजीत!

गुटख्याची विक्री तेजीत!

googlenewsNext

जालना: राज्यात सर्वत्र गुुटखाविक्रीला बंदी असताना शहरासह जिल्ह्यात मात्र गुटखा विक्री तेजीत असून, विक्रेत्यांची चांगलीच चांदी होताना दिसत आहे़ याकडे अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. या विभागाकडून करण्यात येणार्‍या कारवायांचा तपास पूर्ण होत नाही. त्यामुळे या विभागातील अधिकार्‍यांचीच चौकशी करण्याची मागणी होत आहे. शासनाने गुटखाबंदी करून एक वर्षापेक्षा जास्त दिवस झाले आहेत. तरीही शहरासह जिल्हाभरात राजरोसपणे गुटख्याच्या पुड्यांची विक्री सुरू आहे. याकडे अन्न व औषध प्रशासण विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. गुटखाबंदी केल्यानंतर १ ते २ रुपयांना मिळणारी पुडी आता चक्क ५ रूपयाला विकली जात आहे. विशेष म्हणजे अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली. मात्र, ती कागदावरच राहिली असल्याचे चित्र आहे. अनेक छोट्या-मोठ्या टपर्‍या, हॉटेल्सवर सर्रासपणे गुटखा, पानमसाला आदी पुड्या छुप्या पद्धतीने विकल्या जात आहेत. विशेष म्हणजे नेहमीच्या ग्राहकांनाच पुड्या देण्यात येतात. नवीन ग्राहकास ‘पुडी बंद आहे’ असे ठणकावले जाते. होलसेलमध्ये माल पुरवणारे काही व्यापारी आहेत. त्यांचे जाळे हे शहरी व ग्रामीण भागात पोहचलेले आहे. त्यांनीसुध्दा किरकोळ विक्रेत्यांना चढ्या भावाने माल देणे सुरू केल्यामुळे किरकोळ विक्रेते पाच पट अधिक दराने पुड्यांची विक्री करीत आहेत. या प्रकाराला अन्न व औषध प्रशासन विभागाने लगाम लावण्याची गरज आहे़ मात्र याकडे गांभीर्याने लक्ष दिल्या जात नाही. एक-दोन किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई केली जाते. परंतु काही दिवसांनी पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती होत आहे. या विभागातील अधिकारी व कर्मचारी केलेल्या कारवाईचा पुढे काय होते? हे कळतच नाही. कारवाई केल्यानंतर संबंधितांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात येतात. मात्र, पोलिसांकडूनही या प्रकरणात गांभीर्याने घेतले जात नाही. त्यामुळे गुटख्याचा माल येतो कुठून, मुख्य विक्रेता कोण? हे सर्व प्रश्न अनुत्तरीतच राहतात. या विभागाने केलेल्या आतापर्यंतच्या कारवाईचीच आता चौकशीची मागणी जागरूक नागरिकांतून होत आहे. दोन दिवसांपूर्वी जुना व नवीन जालना भागात काही दुकानांची तपासणी केली. मात्र, या तपासणी काय आढळले हे गुलदस्त्यातच ठेवण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Gutkha's fastest selling!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.