कोरोना लढ्यासाठी ‘है तैयार हम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:04 AM2021-03-26T04:04:42+5:302021-03-26T04:04:42+5:30
औरंगाबाद : कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी घाटी रुग्णालयाला गुरुवारी ९ डाॅक्टर, २७ परिचारिका आणि बायोमेडिकल इंजिनिअर मिळाले. नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर यातील अनेक ...
औरंगाबाद : कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी घाटी रुग्णालयाला गुरुवारी ९ डाॅक्टर, २७ परिचारिका आणि बायोमेडिकल इंजिनिअर मिळाले. नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर यातील अनेक जण ‘है तैयार हम’ म्हणत रुग्णसेवेत तात्काळ रुजूही झाले. यामुळे घाटीत काही प्रमाणात कोरोनासाठी रुग्णसेवा देणारे हात वाढले आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी घाटीला मनुष्यबळाची गरज आहे. त्यादृष्टीने १० ड्युटी मेडिकल ऑफिसर (डीएमओ), ७० परिचारिका आणि एक बायामेडिकल इंजिनिअर पदासाठी जाहिरात काढण्यात आली होती. त्यासाठी सकाळपासूनच निवड प्रक्रिया सुरू होती. कागदपत्रांची पडताळणी करून पात्र लोकांना तात्काळ नियुक्ती देण्यात आली. परिचारिकांच्या उर्वरित पदांसाठी यापुढील दिवसात निवड प्रक्रिया केली जाणार आहे.
उपअधिष्ठाता डाॅ. भारत सोनवणे, डाॅ. सिराज बेग, प्राचार्य शिंदे, सहायक मेट्रन संजीवनी गायकवाड आदींनी ही निवड प्रक्रिया पार पाडली. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने घाटीला खाटा वाढविण्याची सूचना करण्यात आली. काही प्रमाणात मनुष्यबळ मिळाल्याचे प्रभारी अधिष्ठाता डाॅ. कैलास झिने म्हणाले.
तात्काळ रुजूही
घाटीतील व्हेंटिलेटर, ऑक्सिजन यंत्रणेचे व्यवस्थापन आणि देखभाल-दुरुस्तीच्या दृष्टीने बायोमेडिकल इंजिनिअर गरजेचे होते. हे पद भरले गेल्याने यापुढे व्हेंटिलेटर, ऑक्सिजन यंत्रणेचे अधिक चांगल्याप्रकारे व्यवस्थापन होईल. सकाळच्या सत्रात नियुक्ती मिळाल्यावर अनेक जण तात्काळ रुजूही झाले. अन्य लोक शुक्रवारी रुजू होतील.
- डाॅ. भारत सोनवणे, उपअधिष्ठाता, घाटी
---
फोटो ओळ...
घाटीत गुरुवारी कंत्राटी तत्त्वावरील डाॅक्टर, परिचारिकांना नियुक्तीपत्र देताना उपअधिष्ठाता डाॅ. भारत सोनवणे, डाॅ. सिराज बेग आदी.