‘जय भद्रा’चा जयघोष
By Admin | Published: August 3, 2014 12:54 AM2014-08-03T00:54:33+5:302014-08-03T01:11:49+5:30
खुलताबाद : ‘भद्रा हनुमान की जय’ म्हणत श्रावण महिन्याच्या पहिल्याच शनिवारी लाखो भाविकांनी येथील भद्रा मारुतीचे दर्शन घेतले. शनिवारी दिवसभर खुलताबादनगरी हनुमान भक्तांनी दुमदुमली होती.
खुलताबाद : ‘भद्रा हनुमान की जय’ म्हणत श्रावण महिन्याच्या पहिल्याच शनिवारी लाखो भाविकांनी येथील भद्रा मारुतीचे दर्शन घेतले. शनिवारी दिवसभर खुलताबादनगरी हनुमान भक्तांनी दुमदुमली होती.
श्रावण महिन्यातील शनिवारी भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यात औरंगाबाद शहर परिसरातून पायी येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते. त्याचबरोबर नगर, नाशिक, जळगाव, धुळे, जालना जिल्ह्यातूनही भाविक मोठ्या संख्येने येतात. शुक्रवारी रात्रीच अनेक ठिकाणच्या दिंड्या, पालख्या खुलताबादेत दाखल झाल्या होत्या.
श्रावणातील पहिलाच शनिवार असल्याने शुक्रवारी रात्रीपासूनच पायी येणाऱ्या भाविकांचे जत्थेच्या जत्थे खुलताबादेत दाखल होत होते. शुक्रवारी रात्रीपासून औरंगाबाद-खुलताबाद रस्ता भक्तांनी फुलून गेला होता. भाविकांच्या गर्दीने वाहतूक खोळंबत होती. रात्रीपासूनच लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्या शनिवारी रात्री उशिरापर्यंत तशाच होत्या. संस्थानतर्फे स्पेशल दर्शन ५० रुपये ठेवण्यात आले होते. स्पेशल दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिरात अनेक भाविकांनी चहा-पाणी, केळी, साबुदाणा खिचडीचे वाटप केले. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता एस.टी. महामंडळाच्या वतीने जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती, तर औरंगाबाद मार्गावर सिटीबस सोडण्यात आल्याने भाविकांनी याचा लाभ घेतला. मोठ्या प्रमाणावर हार, फुले, नारळ व प्रसादाची विक्री झाली होती. भाविकांचे दर्शन सुरळीत व्हावे म्हणून भद्रा मारुती संस्थानचे अध्यक्ष काशीनाथ बारगळ, सचिव कचरू बारगळ, सुरक्षा अधिकारी राजेंद्र जोंधळे व त्यांचे सहकारी परिश्रम घेत होते. (वार्ताहर)