जयघोषाने कपिलधार दुमदुमले
By Admin | Published: November 15, 2016 01:01 AM2016-11-15T01:01:41+5:302016-11-15T01:02:27+5:30
बीड संत मन्मथस्वामी यांची संजीवन समाधी असलेल्या श्री क्षेत्र कपिलधार (ता. बीड) येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांच्या उपस्थितीत यात्रोत्सव पार पडला.
राजेश खराडे बीड
संत मन्मथस्वामी यांची संजीवन समाधी असलेल्या श्री क्षेत्र कपिलधार (ता. बीड) येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांच्या उपस्थितीत यात्रोत्सव पार पडला. राज्यासह परराज्यातून दाखल झालेल्या दिंडीतील लाखो भाविकांनी दर्शनासाठी रविवारी रात्रीपासून रांगा लावल्या होत्या. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या उपस्थितीमध्ये शिवनाम सप्ताहाची सांगता झाली. गुरुनाथ माऊलींच्या जयघोषाने मंदिराचा परिसर भक्तिमय झाला होता.
कपिलधार येथे डोंगरदऱ्यात असलेल्या पुरातन मंदिरावर रोषणाई व आकर्षक सजावट करण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यासह राज्याबाहेरुन सोमवारी दुपारपर्यंत ६० दिंड्या दाखल झाल्या होत्या. मन्मथ स्वामींचा जयघोष करीत भाविक रांगेत उभे राहून दर्शनाचा लाभ घेत होते. दुपारी १२ वाजता अहमदपूरकर महाराजांची दिंडी दाखल झाली होती. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रमाला सुरूवात झाली. वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. जयदत्त क्षीरसागर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, देवस्थान कमिटीचे सचिव अॅड. शांतीवीर चौधरी आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शासकीय महापूजा पार पडली. संस्थानतर्फे भक्तांच्या निवासाची मोफत सोय करण्यात आली होती. मंदिर परिसरातील सभामंडपात शिवा संघटनेचा राज्यव्यापी मेळावा तर घाटमाथ्यावर वीरशैव लिंगायत समाजाचा महामेळावा व रिंगण सोहळा पार पडला. यंदा धुवाँधार पावसामुळे मंदिर परिसरातील धबधबा धो-धो वाहत आहे. तेथे ‘सेल्फी’ घेण्याचा मोह अनेक भाविकांना आवरता आला नाही. यात्रोत्सवात कुठलाही गैरप्रकार होऊ नये, दर्शन सुरळीत व्हावे याकरता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. संजीवन समाधीचे दर्शन घेऊन सायंकाळी दिंड्या परतीच्या मार्गावर होत्या. रात्री डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांचे कीर्तन पार पडले.
भाविकांसाठी उपक्रम
भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मंदिर परिसरात सामाजिक संस्थेच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी व प्राथमिक उपचाराची सोय करण्यात आली होते. देवस्थान कमिटी व वीरशैव लिंगायत समाज बीडच्या वतीने मोफत अन्नदान करण्यात आले. देवस्थान कमिटीचे स्वयंसेवक व आनंद शहागडकर यांनी परिश्रम घेतले. रक्तदान शिबीर, स्वच्छता मोहीम, नेत्र तपासणी आदी उपक्रमही पार पडले.
अखेर रस्ता प्रश्न मार्गी
कपिलधारला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला असला तरी रस्त्याच्या दुरवस्थेने भाविकांना त्रास सहन करावा लागला. मांजरसुंबा आणि कपिलधारवाडी येथून येणाऱ्या मार्गासाठी १ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर झाला असून, रस्ता कामाच्या निविदा ९ आॅक्टोबर २०१६ रोजी काढण्यात आल्या आहेत. तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी १० कोटीचा निधीही मंजूर झाला आहे. त्यामुळे आगामी यात्राकाळात रस्त्याची दुर्दशा संपणार असल्याचे चित्र आहे.