गारपीटग्रस्तांच्या यादीत घोळ !
By Admin | Published: June 22, 2014 11:09 PM2014-06-22T23:09:04+5:302014-06-23T00:25:17+5:30
उमरगा : तालुक्यातील कोराळ येथील गारपीटग्रस्तांच्या यादीतून १२२ शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत.
उमरगा : तालुक्यातील कोराळ येथील गारपीटग्रस्तांच्या यादीतून १२२ शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली असून, प्रशासनाने नवीन यादी तयार करून त्यानुसार अनुदानाचे वाटप करावे, अशी मागणी या शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोराळ येथील अनुदानाच्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जिल्हा बँकेच्या येणेगूर शाखेत डकविण्यात आली आहे. परंतु, यातून गावातील १२२ शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत. याबाबत दाळींबच्या तलाठ्याने ही चूक कृषी सहाय्यकाची असल्याचे सांगितले. याशिवाय बँकेच्या यादीत खाडाखोडही झाली असून, हस्तलिखित नावांचा समावेश करण्यात आला आहे. काही शेतकऱ्यांच्या नावात बदलही झाले आहेत. त्यामुळे यादीतील नावांची दुरूस्ती करून वगळलेल्या शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करावीत. तसेच यास जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावर विलास भगत, इंद्रजीत निटुरे, व्यंकट साळुंके, दत्तू सुरवसे, नामदेव सगर, ज्ञानोबा माने, सिद्राम जंगाळे, पांडुरंग गायकवाड, सुनीता जाधव, शाम माडजे, लता सगर, सत्यवान गायकवाड आदींच्या सह्या आहेत. (वार्ताहर)