गारपिटीतील नुकसानीचे पंचनामे रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2017 11:51 PM2017-03-24T23:51:23+5:302017-03-24T23:52:53+5:30
लातूर :कृषिमंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र १० दिवस उलटले तरी अद्याप कुठल्याही गावाच्या नुकसानीचा अहवाल प्राप्त झालेला नाही.
लातूर : १५ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे लातूर, औसा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रबी पिकांचे नुकसान झाले. द्राक्ष बागा व आंब्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पालकमंत्र्यांसह कृषिमंत्र्यांनी महसूल व कृषी यंत्रणेला नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र १० दिवस उलटले तरी अद्याप कुठल्याही गावाच्या नुकसानीचा अहवाल प्राप्त झालेला नाही.
१५ व १६ मार्च असे दोन दिवस लातूर जिल्ह्यात अवकाळीने कहर केला होता. औसा तालुक्यात जवळपास २२ हजार हेक्टर तर लातूर तालुक्यात साडेआठ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला होता. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवकांची गावस्तरावर समिती स्थापन करून या समितीकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.
आता १० दिवस उलटले तरी अद्याप एकाही गावाच्या नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झालेला नाही. पंचनामे चालू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. आणखीन पाच ते सहा दिवस पंचनाम्याला वेळ लागणार आहे. दोन दिवस झालेल्या गारपिटीमुळे नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता यंत्रणेला आहे. त्यामुळे पंचनाम्याला वेळ लागू शकतो, असे जिल्हा कृषी कार्यालयातून सांगण्यात आले.
जिल्ह्यात सगळीकडे अवकाळी पाऊस झाला असला, तरी केवळ औसा, लातूर आणि अहमदपूर या तालुक्यांतच गारपिटीमुळे नुकसान झाले असल्याचे म्हणणे सरकारी यंत्रणेचे आहे. (प्रतिनिधी)