सिल्लोड तालुक्यात दुसऱ्या दिवशीही गारपीट; धावत्या दुचाकीवर वीज कोसळून एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 07:43 PM2024-04-12T19:43:42+5:302024-04-12T19:44:01+5:30
यावेळी झालेल्या गारपीटीमध्ये शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सिल्लोड: तालुक्यातील १० गावांत गुरुवारी सायंकाळी व शुक्रवारी दुपारी ४ वाजता असे दोन दिवस वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यावेळी झालेल्या गारपीटीमध्ये शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर उंडणगाव येथे वीज कोसळून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
आज दुपारी अंभई, घाटनांद्रा, हट्टी, बहुली, मांडणा, अजिंठा, शिवना, गोळेगाव, राहिमाबाद, आसडी, मंगरुळ, उंडणगाव, केळगाव सर्कल मध्ये वादळी वाऱ्या सहित अवकाळी पाऊस झाला. रहिमाबाद, आसडी, मंगरुळ, डोंगरगाव, मांडणा, हट्टी, बहुली, चांदापुर परिसरात गारपीट झाली. यात सिड्सचा कांदा, मिरचीचे रोप, शिमला मिरची, बाजरी, ज्वारी, मका पिकांचे व फळबागेचे मोठे नुकसान झाले. वाऱ्यामुळे आंब्याच्या कैऱ्या पडल्या.
गारपीटीमुळे चिंचपुर येथील शेतकरी विजय जंजाळ यांच्या मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले. प्रकाश जंजाळ यांच्या कांदा सिड्स पिकाचे नुकसान झाले. तर माधव पाटील जंजाळ यांच्या जनावरांच्या गोठ्यावरील टिन पत्रे उडाली त्यावर एक झाड कोसळले त्यात एक मैस जखमी झाली. सोलारच्या प्लेटा फुटल्या.
सलग दोन दिवस सिल्लोड तालुक्यात झालेल्या अवकाळी व गारपीटमुळे झालेल्या नुकसानीचे तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहायक यांनी तात्काळ पंचनामे करावे असे आदेश सिल्लोडचे तहसीलदार रुपेश खंदारे यांनी दिले आहेत. गारपीटमुळे तालुक्यातील जवळपास २०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला आहे.
उंडणगाव येथे दुचाकीवर वीज कोसळली
सोयगाव येथून शेख जाबेर शेख रउफ ( २२, रा सोयगाव ह. मु. सिल्लोड) हा आईसह दुचाकीवर सिल्लोडकडे येत होते. यावेळी अचानक धावत्या दुचाकीवार वीज कोसळली. यात शेख जाबेर शेख रउफ याचा जागीच मृत्यू झाला. तर हाजराबी उर्फ शबाना शेख रउफ ( ४५ रा.सोयगाव ह मु सिल्लोड) या गंभीर जखमी झाल्या आहेत.