ह्रदयद्रावक... हायवा-बलेनोचा भीषण अपघात; शिक्षक बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू
By राम शिनगारे | Published: April 18, 2023 09:56 PM2023-04-18T21:56:54+5:302023-04-18T21:57:26+5:30
या अपघाताची नोंद सातारा पोलिस ठाण्यात केल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली.
राम शिनगारे
छत्रपती संभाजीनगर : कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक कुटुंबाला विचित्र अपघातात टिपरने चिरडले. त्यात शिक्षकासह १० वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना नक्षत्रवाडीतील स्मशानभूमीसमोर मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. या अपघाताची नोंद सातारा पोलिस ठाण्यात केल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली.
मृतांमध्ये शिक्षक संजय सुखदेव दहिफळे (४३) आणि त्यांचा मुलगा समर्थ (१०, मुळ गाव रा. पिंपळवाडी, ता. पैठण) या दोघांचा समावेश आहे. तर संजय यांची पत्नी वर्षा (३५) गंभीर जखमी असून, सिग्मा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संजय हे पत्नी, मुलासह दुचाकीवरून (एमएच २० सीएन ९२७८) पैठणकडे सायंकाळी जात होते. नक्षत्रवाडीतील स्मशानभूमीसमोर पैठणकडून खडीचा हायवा (एमएच २० ईजी ४६४४) येत होता. तर पैठणकडेच बलेनो कार (एमएच २० सीएन ९२७८) जात होती. हायवाने कारला जोराची धडक दिली. त्यात कार एका बाजूला जाऊन थांबली. त्याचवेळी हायवाने उजव्या बाजूला येत शिक्षकाच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकी हायवाच्या चाकाखाली आली. हा हायवा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या हायवावर जाऊन आदळला. तेव्हा दुचाकीला फरफटतच दोन्ही हायवांच्या मध्ये दाबली गेली. त्यात बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती ११२ वर देण्यात आल्यानंतर पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार, सहायक निरीक्षक विनायक शेळके, वाहतूक शाखेचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह इतरांनी धाव घेतली. जखमींना घाटी रुग्णालयात हवलिण्यात आले.