हज यात्रेकरू उद्यापासून परतणार
By Admin | Published: October 17, 2014 11:34 PM2014-10-17T23:34:50+5:302014-10-17T23:55:42+5:30
औरंगाबाद : हज यात्रेकरूंच्या परतीचा प्रवास रविवार, दि. १९ आॅक्टोबरपासून सुरू होणार आहे.
औरंगाबाद : हज यात्रेकरूंच्या परतीचा प्रवास रविवार, दि. १९ आॅक्टोबरपासून सुरू होणार आहे. मदिना येथून दररोज एक विमान २३३ यात्रेकरूंना घेऊन थेट औरंगाबादेत दाखल होणार आहे. मराठवाड्यातून २ हजार ३३० यात्रेकरू पवित्र यात्रेसाठी गेले होते. त्यातील एका ८५ वर्षीय यात्रेकरूचे गुरुवारी मदिना येथे निधन झाले.
७ ते १६ सप्टेंबरदरम्यान दररोज एका विमानाने २३३ यात्रेकरू पवित्र हज यात्रेला रवाना झाले होते. यात्रेतील सर्व विधी पार पडल्यानंतर पहिला जथा रविवारी सकाळी ७.२० वाजता चिकलठाणा विमानतळावर दाखल होणार आहे. १९ ते २४ आॅक्टोबरपर्यंत दररोज एक विमान मदिना येथून येईल. प्रत्येक विमानात २३३ यात्रेकरू राहणार असून २३ आॅक्टोबरपर्यंत सकाळीच यात्रेकरू चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होतील. विमानतळात दाखल होताच प्रत्येक यात्रेकरूची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. इबोला या आजारामुळे ही काळजी शासनाकडून घेण्यात येत आहे.
२५ आॅक्टोबर रोजी दुपारी २.२५ वाजता, २६ रोजी सायंकाळी ७ वाजता, २७ रोजी दुपारी १.३० वाजता आणि २८ रोजी रात्री ९ वाजता विमान येणार आहे. मराठवाड्यातून २ हजार ३३० यात्रेकरू गेले होते. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. गुरुवारी सायंकाळी जालना येथील एका ८५ वर्षीय वृद्ध यात्रेकरूचे निधन झाले.